नाथाभाऊंचे भाजपला अल्टीमेटम, लवकरच पक्षांतर !


जळगाव – माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपली खद्खद बोलून दाखवताना माझ्या विरोधात गेल्या 4 वर्षांत षडयंत्र रचून विनाकारण मला छळण्यात आले. पक्षावर माझा रोष नाही. पण माझ्याविरुद्ध षडयंत्र करणारे 4 ते 5 जण आहेत. मी पक्षश्रेष्ठींकडे त्यांची नावे दिली आहे. त्यांच्यावर जर पक्षश्रेष्ठींनी कारवाई केली नाही तर लवकरच आपण पक्षांतर करू, असा निर्वाणीचा इशारा देत भाजपला अल्टीमेटम दिला आहे. खडसे काल नागपूर, दिल्ली येथून जळगावात आले होते. ते त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खडसेंनी पक्षांतराच्या विषयावर आपले मत मांडले.

ते यावेळी म्हणाले, पक्षावर अथवा केंद्रीय नेत्यांवर माझा कोणताही रोष नाही. पण, पक्षातील काही व्यक्तींवर निश्चित राग आहे. पक्षात ते केवळ षडयंत्र रचत असतात. माझ्या विरुद्धही गेली 4 वर्षे त्यांनी षडयंत्र रचून मला विनाकारण बदनाम केले. माझ्यावर आरोप करणे, चौकश्या लावणे, असे प्रकार त्यांनी केले आहेत. मी या लोकांविरुद्ध तक्रार केली आहे. त्यांची नावेही तक्रारीत दिली असून त्यासंबंधी सर्व पुरावेही दिले असल्यामुळे आता पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, हीच माझी अपेक्षा आहे. माझा ज्यांच्यावर रोष आहे, मी त्यांच्यासोबत काम कसे करणार? संबंधित लोकांवर पक्षाने कारवाई केली नाही तर मी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाईल. माझ्यावर माझ्या समर्थकांसह राज्यभरातील कार्यकर्त्यांचा पक्षांतराचा मोठा दबाव आहे. त्यामुळे मला आता काय तो निर्णय घ्यावाच लागणार असल्याचेही खडसे यावेळी म्हणाले.

गंभीर स्वरुपाचे आरोप ज्यांच्यावर आहेत, अशा अन्य नेत्यांना पक्षात प्रवेश मिळतो. पक्षात त्यांना महत्त्वाचे स्थान दिले जाते. इतर पक्षातील नेत्यांना पायघड्या टाकल्या जात असताना मला डावलण्याचे कारण काय? असा प्रश्‍नही खडसेंनी उपस्थित करत आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. दरम्यान, आपण पक्षांतर करण्याबाबत सकारात्मक असल्याचे संकेत खडसेंनी दिले असले तरी ते कोणत्या पक्षात जातील, हे मात्र त्यांनी स्पष्ट न केल्यामुळे खडसे कोणत्या मार्गाने जातात, या बाबतीत उत्सुकता कायम आहे.

Leave a Comment