स्वच्छता भांड्यांची


वर्षानुवर्ष आपली भांडी चांगली रहावी असे वाटत असल्यास त्याची योग्य स्वच्छता आणि योग्य निगा फारच महत्त्वाची आहे. रोजच्या स्वयंपाकाला लागणारी भांडी असो किंवा काचेची भांडी असोत. भांड्यांची स्वच्छता हे एक महत्त्वाचे काम आहे.

क्रॉकरीची काळजी – रोज न वापरली जाणारी काचेची भांडी वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळू ठेवा. त्यामुळे भांड्यावर ओरखडे येणार नाहीत किंवा डागही पडणार नाही. ज्या काचेच्या भांड्यावर सोनेरी किंवा चंदेरी धातूची रिम असते ती मायक्रोव्हेव साठी वापरू नका. काचेच्या भांड्यावर कोणतेही डाग पडले असतील तर ती प्रथम कोमट पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ती स्वच्छ करा. क्रोकरीमधील कप हे टांगून ठेवू नका त्यामुळे कपाचे कान कमजोर होतात. काचेच्या भांड्यांचा वापर झाल्यावर शक्‍यतो ती ताबडतोब धुवून टाकावी. अन्यथा चहा, कॉफी, भाजी, वरण यांचे डाग कायम राहतात.

तांब्याची भांडी – तांब्याची भांडी लवकर गरम होतात तशीच ती लवकर गारही होतात. त्यामुळे तांब्याच्या भांड्यात अन्न शिजवताना गॅसची आंच मंद ठेवावी तसेच तांब्याचे रिकामे भांडे कधीच गरम करायला ठेवू नये. तांब्याच्या भांड्यावर हवेचाही परिणाम होत असतोच. त्यामुळे भांड्यावर डाग पडतात. ही भांडी साफ करण्यासाठी त्यात चिंचेचा रस घालावा. त्यानंतर कोरड्या मीठाने रगडून ती भांडी साफ करावीत. त्यामुळे भांडी चमकतील. तांब्याची भांडी साफ करताना सौम्य साबण आणि मऊ घासणीचा वापर करावा. तांब्याची भांड्यासाठी तीव्र साबण, स्टीलची घासणी आदींचा वापर करू नये.

पितळेची आणि चांदीची भांडी – पितळेची आणि चांदीची भांडी यांच्यावरील डाग साफ करण्यासाठी ती गरम पाण्यात टाकावी. मग लिंबू किंवा चिंचेच्या पाण्यात थोडे व्हिनेगर घालून ही भांडी साफ करावीत मग पुन्हा गरम पाण्याने धुवावीत.

स्टीलची भांडी – स्टीलची भांडी स्वच्छ करण्यासाठी डिश वॉशिंग लिक्विडचा वापर करावा. स्टीलच्या भांड्यावरील डाग घालवण्यासाठी कांद्याच्या रसात व्हिनेगर घालून त्याने ही भांडी साफ करा. स्टीलच्या भांड्यावरील डाग काढण्यासाठी व्हिनेगरमध्ये स्वच्छ कपडा बुडवून त्याने भांडे पुसावे मग स्वच्छ कपड्याने पुसावे. स्टीलच्या भांड्यामध्ये खूप वेळ व्हिनेगर टाकून ठेवू नये. असे केल्यास रंग कमी होतो. स्टीलच्या भांड्यांवरील पाण्याचे डाग काढण्यासाठी सुती कपडा ऑलिव्ह तेलात बुडवून डाग पडलेल्या जागी चांगले रगडावे. मग सुक्‍या कापडाने पुसून घ्यावे. त्यामुळे भांडी चमकू लागतील.

नॉनस्टिक भांडी – नॉनस्टिक भांड्यामध्ये स्वयंपाक केल्यानंतर ती भांडी सुकण्यापुर्वी त्यात पाणी घालून ठेवावीत. कारण ही भांडी सुकल्यानंतर ती साफ करताना अधिक जोर देऊन घासावी लागतात. त्यामुळे नॉनस्टिक कोटिंग निघून जाण्याची शक्‍यता असते. नॉनस्टिकची भांडी साफ कऱण्यासाठी पातळ साबण आणि नायलॉनची घासणीच वापराली. ही भांडी धुतल्यानंतर लगेचच सुकवावी. ती अधिक वेळ ओलसर राहिल्यास त्यांवर पाण्याचे डाग पडतात.

Leave a Comment