मेजवानीसाठी जाण्यापूर्वी…


लग्न समारंभ म्हणून कुणाचा वाढदिवस किंवा ऑफिसमध्ये सेमिनार, कोणाचे प्रमोशन वगैरे अनेक निमित्तांमुळे हॉटेलमध्ये किंवा कुणाच्या घरी मेजवानीसाठी जाण्याचे प्रसंग वरचेवर येत असतात. मेजवानीला गेल्यानंतर उत्साहाच्या भरात समोर येईल ते खाल्ले जाते आणि मग घरी आल्यानंतर अपचन, गॅसेस, अॅसिडीटी असले त्रास सुरु होतात आणि या सर्व त्रासांमुळे मेजवानीहून आल्यानंतरचा दुसरा दिवस अतिशय वाईट जातो. ह्या सर्व त्रासांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर कुठेही मेजवानीसाठी जाण्याअगोदर काही गोष्टींची काळजी घ्यावी.

मेजवानीला जाण्याआधी घरीच हल्का नाश्ता करावा. बहुतेक वेळी मेजवानीला गेल्यानंतर जेवण्यास उशीर होतो आणि एकदा जेवण समोर आले की मग भूक अनावर होत असल्याने खाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणे कठिण होते. त्यामुळे घरून निघायच्या आधी सॅलड, मोडविलेली कडधान्ये, एखाद्या डाळीचे वरण अशा प्रकारच्या अन्नपदार्थांचे सेवन करावे. या अन्नपदार्थांमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहून मेजवानीच्या तेलकट, पचण्यास जड जेवणावर ताव मारण्याचा मोह आवरता येणे शक्य होईल.

आपल्याकडील मेजवान्यांमधील जेवणाचा कार्यक्रम गोडधोडाच्या मनःपूर्वक आग्रहाशिवाय पूर्ण होत नाही. या आग्रहाला मान देत आपण ही दोन घास जास्तच जेवतो. पण याप्रमाणे केल्या जाणाऱ्या आग्रहाला मान देताना आपण आपल्या पोटाचा विचारही करणे आवश्यक आहे. वाजवीपेक्षा जास्त खाल्ले गेलेले अन्न पोटाच्या त्रासांना आमंत्रण ठरू शकते. तसेच, मेजवानीच्या वेळी, जास्त प्रमाणामध्ये साखर असलेली पेये, सॉफ्ट ड्रिंक्स टाळावीत. त्या ऐवजी लिंबू सरबत, किंवा सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे साधे पाणी अशा पेयांचे सेवन जास्त करावे.

मेजवानीच्या दिवशी तेलकट, गोड पदार्थ जास्त खाल्ले गेले असल्यास आपल्या व्यायामामध्ये त्यानुसार आवश्यक ते बदल करून जास्तीच्या कॅलरीज कशा खर्च गेल्या जातील ते पहावे. मेजवानीच्या दुसऱ्या दिवशीचा आहार अगदी हलका असावा. व्यायाम करण्यास वेळ नसेल तर ऑफिसमध्ये किंवा घरी जिने चढणे, चालणे अश्या प्रकारचे व्यायाम करावेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment