या सवयी टाळणे आरोग्यास हितकारी


प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या खास अश्या काही सवयी असतात. या सवयी बहुतेकवेळी नकळतच आत्मसात केलेल्या असतात. या सवयींबद्दल आपण विचारही करत नाही. या सवयी वरकरणी अपायकारक वाटत नसल्या, तरी प्रत्यक्षात मात्र या सवयींचे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असतात. त्यामुळे अशा सवयींबद्दल विचार करून प्रत्येकाने आपल्याला योग्य असा बदल करायला हवा.

खुर्चीवर बसताना एका पायावर दुसरा पाय टाकून बसण्याची सवय बहुतेक सर्वच जणांना असते. विशेषतः महिला खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसताना एका पायावर दुसरा पाय टाकून बसताना दिसतात. पण ही सवय पाठीच्या कण्यासाठी त्रासाची ठरू शकते. पायावर पाय टाकून बसल्याने व्हेरिकोज व्हेन्स चा त्रास उद्भवू शकतो. असे बसल्याने माकड हाडाचे संतुलन बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे खुर्चीवर बसताना दोन्ही पाय व्यवस्थित जमिनीवर टेकवावेत, व पाठीचा कणा ताठ राहील याची काळजी घ्यावी.

बाजारातून आपण अनेकदा स्वस्त आणि मस्त गॉगल खरेदी करतो. या नव्या स्टाइलच्या गॉगल मुळे मोबाईलवर घेतलेल्या सेल्फी मध्ये जरी तुम्ही छान दिसत असलात, तरी वास्तविक हा गॉगल डोळ्यांसाठी अपायकारक ठरू शकतो. हे गॉगल अतिशय हलक्या प्रतीच्या प्लॅस्टिकपासून बनविले गेलेले असतात. त्यामुळे सूर्याच्या प्रखर किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करण्याची क्षमता या गॉगलमध्ये नसते. त्यामुळे असे गॉगल न वापरता, एखाद्या चांगल्या प्रतीचा गॉगल वापरावा.

शरीराला जेवढी गरज आहे त्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात पाणी पिण्याची सवयही अपायकारक ठरू शकते. दिवसाला आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याचा सल्ला आहारतज्ञ देतात. पण काही लोकांना याही पेक्षा जास्त पाणी पिण्याची सवय असते. पाणी पिताना, आपल्याला तहान लागली आहे का असा विचार केलेला नसतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, किंवा खूप शारीरिक श्रम केल्याने घाम येऊन शरीरातील पाणी कमी होते. त्यावेळी शरीर तशी सूचना आपल्याला देत असते, म्हणूनच तहान लागल्याची भावना होऊन पाणी प्यायले जाते. त्यामुळे पाणी पिण्याच्या बाबतीत शरीर देत असेलेल्या सूचानेकडे लक्ष देऊन, गरज असेल त्याप्रमाणे पाणी पिणे चांगले.

बहुतेक वेळी अंगदुखी सुरु झाली की गरम पाण्याच्या पिशवीने शेक घेण्याचा सल्ला दिला जातो. त्याने आराम ही येतो. गरम शेकामुळे आखडलेले स्नायू शिथिल होऊन, अंगदुखी कमी होते. मात्र काही बाबतीत गरम पाण्याच्या पिशवीचा शेक अपायकारक ठरू शकतो. कुठ्ल्याही प्रकारची ओली जखम गरम पाण्याच्या पिशवीने शेकू नये. जखमेतून रक्तस्राव होत असेल तर शेक अजिबात घेऊ नये. तसेच अचानक उद्भवलेली पोटदुखी जर अपेंडीसायटिस मुळे असेल, तर अश्या वेळी पोटावर गरम पाण्याच्या पिशवीचा शेक घेणे घातक ठरू शकते.

आजकाल लहान मुलांना अगदी मिनिटभरात तयार करून देता येण्यासारखे खाद्यपदार्थ बाजारात उपलब्ध आहेत. त्या खाद्यपदार्थांपैकी एक म्हणजे मायक्रोवेव्ह मध्ये तयार करता येणारे पॉपकॉर्न. या पॉपकॉर्न मध्ये डायासिटाईल नावाचे तेलासदृश दिसणारे द्रव असते. मायक्रोवेव्ह मध्ये पॉपकॉर्न गरम करताना ह्या द्रवाची वाफ तयार होते. पॉपकॉर्न तयार झाल्यानंतर त्याचे पॅकेट एकदम उघडल्यास डायासिटाईल च्या वाफेमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे पॉपकॉर्नच्या पॅकेट मधील वाफ संपूर्णपणे नाहीशी झाल्यानंतरच पॉपकॉर्न खाण्यास घ्यावेत.

वजन कमी करण्यासाठी काटेकोरपणे डायट करणाऱ्या व्यक्तींना ‘ फॅट फ्री ‘ दुध घेण्याचा सल्ला दिला जातो. पण असे दुध शरीराला संपूर्ण पोषण देऊ शकत नाही कारण या दुधामधून शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या फॅट्स बरोबरच, दुधातील इतर पोषक तत्वे ही काढून टाकली जातात. त्यामुळे या दुधामधून शरीराला आवश्यक ते पोषण मिळत नाही. त्यामुळे आहाराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्यांनी अगदी पूर्णपणे फॅट फ्री दुधाचे सेवन न करता, कमी प्रमाणात फॅट्स असलेल्या दुधाचे ( टोन्ड मिल्क ) सेवन करावे.

Leave a Comment