डम्प यार्डमध्ये धूळ खातेय निर्भया केस मधली बस


निर्भया रेप केस मधील सर्व आरोपींना फाशी सुनावली गेल्यावर या प्रकरणात जी बस वापरली गेली ती कुठे आहे याचे उत्तर मिळाले आहे. १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री याच बसमधून निर्भया आणि तिचा मित्र प्रवास करत असताना निर्भयावर अमानुष बलात्कार केला गेला होता आणि तिच्या मित्राला मारहाण करून या दोघांना या चालत्या बसमधून ढकलून दिले गेले होते. त्यानंतर रुग्णालयात ऊपचार सुरु असताना निर्भयाचा मृत्यू झाला होता.

डीएल – १ पीसी ०१४९ या नंबरची ही बस दिनेश यादव या माणसाच्या मालकीची होती. बस मध्ये घडलेल्या अमानुष प्रकारानंतर दिल्ली पोलिसांनी ती कस्टडी मध्ये ठेवली होती आणि यादव यांनी बस परत मागितल्यावरही त्यांना ती परत दिली गेली नव्हती. बसमधला मीटर ही बस २,२६,७८४ किमी रनिंग झालेली असल्याचा काटा आजही दाखवितो आहे. निर्भया प्रकरणानंतर पेटून उठलेल्या निदर्शकांनी ती फोडली होती. मात्र त्यानंतर ती साकेत कोर्ट परिसरात होती.

निर्भया प्रकरण झाल्यावर ही बस पुन्हा रस्त्यावर दिसली तर दंगली उसळतील या भीतीने ती रस्त्यावर न आणता सुरक्षित ठेवली गेली. निदर्शने करणाऱ्या जमावाने ती जाळून टाकण्याची मागणी केली होती पण बस मध्ये महत्वाचे काही पुरावे मिळू शकतात म्हणून पोलिसांनी गुप्तपणे ही बस त्यागराज स्टेडियम परिसरात अन्य बस ताफ्यात पार्क केली होती असे समजते. या बसवर साध्या वेशातील पोलिसांचा पहारा होता. सहा वर्षे ही बस साकेत कोर्टात होती नंतर ती वसंत विहार पोलीस स्टेशन मध्ये सुरक्षित ठेवली गेली. गेल्या एप्रिल मध्ये सुप्रीम कोर्टाने पोलीस ठाण्याचा परिसरातील जुनी वाहने नष्ट करण्याचे आदेश दिल्यावर ही बस क्रेनच्या सहाय्याने डंप यार्ड मध्ये हलविली गेली असे समजते.

Leave a Comment