CAA चे समर्थन परिणितीला पडले महागात


मागील काही दिवसांपासून देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलने सुरु आहेत. रविवारी विद्यापीठांसह शिक्षण संस्थांच्या आवारामधून सुरु झालेल्या आंदोलनाची धग गुरुवारी देशभर पसरली आणि दिल्लीसह मुंबई, बंगळूरु, लखनौ आदी शहरांबरोबरच विविध राज्यांत लोक रस्त्यावर उतरले. अनेक कलाकारांनी याच पार्श्वभूमीवर सोशल नेटवर्किंगवरुन या कायद्याविरोधात आपले मत नोंदवले आहे. पण अभिनेत्री परिणिती चोप्राला थेटपणे या कायद्याला विरोध करणे महागात पडले असून परिणितीला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या हरयाणा सरकारच्या अभियानाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदावरुन हटवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सुशांत सिंह याने देखील या कायद्याला विरोध केला होता, त्यामुळे त्याला देखील ‘सावधान इंडिया’ कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आले आहे.

परिणितीची हरयाणा सरकारने केंद्राची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली होती. पण परिणितीने ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकारने लागू केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध केल्यानंतर तिला या पदावरुन हटवण्यात आल्याचे वृत्त जागरण डॉट कॉमने दिले आहे. परिणिती आता आमच्या मोहिमेची ब्रँड अॅम्बेसेडर नसल्याचे राज्यातील ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेचे संचालक असणाऱ्या योगेंद्र मल्लिक यांनी स्पष्ट केले आहे. हरयाणामध्ये सध्या मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार सत्तेत आहे. परिणीतीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून खट्टर यांच्या उपस्थितीमध्ये २०१५ मधील एका कार्यक्रमामध्ये नियुक्ती करण्यात आली होती.

परिणीतीने ट्विटवरुन दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये उडालेल्या धुमश्चक्रीनंतर या घटनेबद्दल संताप व्यक्त केला होता. आता देशात लोकशाही असल्याचे म्हणणे बंद करायला हवे, असा टोला तिने ट्विटरवरुन लगावला होता. जर प्रत्येक वेळी नागरिकांनी त्यांचे विचार मांडल्यानंतर असेच काही होत असेल, तर सुधारित नागरिकत्व कायदा विसरुन जायला हवा. आपण हे विधेयक स्वीकारावे आणि आपल्या देशाला लोकशाही देश म्हणणे सोडून द्यावे. आपले मत मांडणाऱ्या निर्दोष व्यक्तींना मारहाण करण्यात येत आहे? ही क्रुरता असल्याचे ट्विट परिणीती चोप्राने केले होते.

अभिनेता सुशांत सिंहनेही काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने लागू केलेल्या कायद्याविरोधात भूमिका घेतल्यामुळेच त्याला सावधान इंडिया कार्यक्रमामधून वगळण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. मला कोणतेही अंदाज व्यक्त करायचे नाहीत. मी ज्यादिवशी आंदोलनात सहभागी झालो त्याच दिवशी करार रद्द होणे हा योगायोग असू शकतो. मला खरच कारण माहित नाही. पण सूत्रसंचालक बदलण्याचा हक्क चॅनेलकडे असल्याची प्रतिक्रिया सुशांतने यानंतर दिली होती.

Leave a Comment