आयपीएलमधील आठ संघांकडून खेळणारा एकमेव ऑस्ट्रलियन क्रिकटेपटू!


कोलकाता: काल गुरुवारी कोलकाता शहरात २०२०मध्ये होणाऱ्या आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याला सर्वाधिक १५.५० कोटींची बोली लागली. युवराज सिंग (१६ कोटी) नंतर आयपीएलच्या इतिहासात एखाद्या खेळाडूसाठी लावण्यात आलेली ही सर्वात मोठी बोली ठरली आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची यावेळीच्या लिलावात सर्वाधिक चांदी झाली.

यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ऑस्ट्रेलियाचा वनडे संघाचा कर्णधार अ‍ॅरन फिंच खेळणार आहे. त्याला बंगळुरू संघाने ४.४० कोटींना विकत घेतले. फिंच याने यासह नवा विक्रम रचला आहे. फिंच हा आयपीएलच्या इतिहासात आठ वेगवेगळ्या संघांकडून खेळणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

२०१०मध्ये फिंच याने आपल्या आयपीएल करिअरला सुरुवात केली होती. राजस्थान रॉयल्स संघाकडून सुरुवात केल्यानंतर फिंचने दोन वर्ष दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर झालेल्या लिलावात पुणे वॉरियर्स संघाने त्याला विकत घेतले. तर २०१४च्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी आणि २०१५मध्ये तो मुंबई इंडियन्स संघासाठी मैदानात उतरला.

२०१६मध्ये गुजरात लॉयन्स संघाकडून फिंच खेळला. आयपीएलमधून गुजरातचा संघ बाहेर झाल्यानंतर तो २०१७मध्ये कोणत्याच संघाकडून खेळू शकला नाही. त्याला २०१८च्या लिलावात किंग्ज इलेव्हन पंजाबने विकत घेतले होते. फिंच वगळता असा एकही खेळाडू नाही ज्याने सहापेक्षा अधिक संघाकडून आयपीएलमध्ये भाग घेतला आहे.

यावेळी फिंच मैदानात आयपीएलमध्ये सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या बंगळुरू संघाकडून उतरणार आहे. फिंचचा बंगळुरू संघात समावेश झाल्याने त्यांची फलंदाजी आणखी मजबूत झाली आहे. संघात विराट कोहली आणि ए.बी.डिव्हिलियर्स सारखे स्फोटक फलंदाज आहेत.

Leave a Comment