विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा आणि बलात्कार रोखा : भगतसिंग कोश्यारी


नागपूर – नागपूर विद्यापीठातील आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा म्हणजे बलात्कार रोखता येतील, असे म्हटले आहे. देशभरात अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. संस्कृतचे श्लोक ती रोखण्यासाठी शिकवले पाहिजेत, असे ते म्हणाले.

राज्यपाल नागपूरमध्ये नागपूर विद्यापीठातील जमनालाल बजाज अॅडमनिस्ट्रेटिव्ह भवनाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी त्यांनी महिलांवरील होणारे अत्याचार कसे थांबवण्यात येतील, यावर आपले मत व्यक्त केले. एक अशी वेळ होती, ज्यावेळी घराघरांमध्ये कन्यापूजन केले जात होते. पण देशात सध्या काय घडत आहे? बलात्कार, अत्याचार अशा घटना काही लोकांकडून घडत आहेत. अत्याचारासाठी आपल्या ताकदीचा वापर करावा की सुरक्षेसाठी करावा, असा सवालही त्यांनी केला. विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा म्हणजे असे प्रकार रोखले जातील, असेही ते म्हणाले.

चांगल्या आणि वाईट लोकांमधील फरक, ज्ञानाचा वापर-गैरवापर, सत्ता आणि पैसा अशा विषयांवर यावेळी कोश्यारी यांनी मार्गदर्शनही केले. संस्कृतबाबत यापूर्वी खासदार गणेश सिंग यांनीदेखील वक्तव्य केले होते. अमेरिकेतील एका शैक्षणिक संस्थेच्या संशोधनानुसार नियमितपणे संस्कृत बोलल्यास मज्जासंस्थेस चालना मिळते. तसेच यामुळे मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलही दूर राहतो असा दावा सिंग यांनी केला होता. संगणक प्रोग्रामिंग जर संस्कृतमध्ये केले गेले तर ते सध्याच्या प्रणालीपेक्षा अधिक परिणामकारक आणि कार्यक्षम ठरेल, असे अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने केलेल्या कथित संशोधनाचा हवाला देत त्यांनी सांगितले होते. तसेच संस्कृतवर देशातील ९७ टक्के भाषा या आधारित आहेत आणि त्यामध्ये काही इस्लामिक भाषांचाही समावेश होतो. या भाषांचे मूळ हे संस्कृतमध्येच असल्याचे ते म्हणाले होते.

Leave a Comment