…तर मुशर्रफ यांचा मृतदेह भर चौकात लटकवा


इस्लामाबाद : देशद्रोहाच्या आरोपावरून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेले पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती व लष्करप्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांच्या शिक्षेसंबंधी निकालाचा सविस्तर तपशील समोर आला आहे. यानुसार, मुशर्रफ यांच्यावर तसेच त्यांना मदत करणाऱ्यांवर विशेष न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आहेत. त्याचबरोबर मुशर्रफ यांचे या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच निधन झाले तर त्यांचा मृतदेह फरफटत आणा आणि इस्लामाबादच्या डी-चौकात तीन दिवस फासावर लटकावून ठेवा, असे न्यायालयाने नमूद केले आहे.

सध्या दुबईत मुशर्रफ असून त्यांची प्रकृती खालावली आहे. एका माजी लष्करप्रमुखाला पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही शिक्षा विशेष न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांनी एक विरुद्ध तीन अशा बहुमताने सुनावली. मुशर्रफ यांच्या बंडाच्या काळात त्यांना साथ देणारे, सुरक्षा पुरवणारे सर्व गणवेशधारी अधिकारी-कर्मचारी या देशद्रोहाच्या गुन्ह्यात समान भागीदार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान मुशर्रफ यांनी हा निकाल सुडाच्या भावनेतून देण्यात आला असल्याचे म्हटले आहे. एका व्हिडिओ संदेशात त्यांनी म्हटले आहे की, न्यायालयाची ही कार्यवाहीच संशयास्पद असून त्यांनी यात मला बाजू मांडण्याची संधीही दिली नाही.

Leave a Comment