गरजेपेक्षा जास्त लांबीचा ‘दबंग 3’


मागील महिन्याभरापासून चर्चेत असलेला सलमान खानचा दबंग 3 हा चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. चित्रपटात अॅक्शन, इमोशन आणि ड्रामा हे सर्वकाही अग्रस्थानी असून हा चित्रपट सर्वसमावेशक करण्याचा दिग्दर्शक प्रभुदेवाने प्रयत्न केला आहे. पण तो एक मसाला एंटरटेनर बनला आहे.

स्वत: सलमान खानने चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि त्याचे हे कथाकार म्हणून बॉलिवूडमधील पदार्पण आहे. चुलबुल पांडे (सलमान खान) ची दबंग बनण्याची ही कहाणी आहे. रज्जो (सोनाक्षी सिन्हा) च्या आधी त्याच्या आयुष्यात खुशी (सई मांजरेकर) येते. पहिल्याच नजरेत चुलबुल खुशीच्या प्रेमात पडतो. दरम्यान, या कथेत खलनायक बाली सिंग (किच्चा सुदीप) ची एन्ट्री होते आणि प्रेमकथा रिव्हेंज ड्रामात बदलते.

आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये सलमान खान चित्रपटात दिसत आहे. तर किच्चा सुदीपने उत्तम अभिनय केला आहे. सई मांजरेकरला खुशीच्या भूमिकेत चित्रपटात फारसे स्थान मिळाले नाही, पण तिच्या वाट्याला जेवढी भूमिका आली, त्यात ती सुंदर आणि आत्मविश्वासाने वावरताना दिसली आहे. भावनिक दृश्य तिने उत्तमरित्या साकारली आहे. सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान आणि इतर कलाकार फारसा प्रभाव सोडत नाहीत.

गरजेपेक्षा जास्त लांबीचा चित्रपट झाला असून पात्रांच्या प्रवेशापासून त्यांच्या परिचयात बराच वेळ वाया गेला आहे. तथापि, यामागे सलमानच्या चाहत्यांचा ‘लार्जर दॅन लाइफ’ चित्रपटाचा तर्क असू शकतो. सलमानने कथा तयार करण्यात त्याच्या चाहत्यांची पूर्ण काळजी घेतली आहे. हा चित्रपट रिअल चित्रपटांच्या रसिकांना आवडणार नाही, कारण त्यात युक्तिवाद नाही. पण सिंगल स्क्रीन आणि मसाला चित्रपटांचे दर्शक नक्कीच या चित्रपटासाठी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवताना दिसू शकतात.

Leave a Comment