शेती कामातून शेतकरी दादांना सन्मानाची निवृत्ती


असे म्हणतात घरात काम करणारी गृहिणी आणि शेतीत राबणारा शेतकरी याना आयुष्यात कधीच निवृत्तीचे सुख भोगता येत नाही. मात्र आता काळ बदलत चालल्याचे संकेत थोडेफार मिळू लागले आहेत. अनेक घरातून आई रिटायर होऊ लागली आहे. मात्र शेतकरी दादा निवृत्त झाल्याचे अजून फारसे कुठे ऐकू येत नाही. महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील मोहगाव येथील शेतकरी गजानन काळे यांना वयाच्या ८० व्या वर्षी शेती कामातून निवृत्ती मिळाली असून त्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी पुढाकार घेतला आहे.

गजानन काळे यांना सन्मानाने शेतीकामातून निवृत्त करायचा निर्णय त्याच्या परिवाराने घेतला. गेली ६० वर्षे ते शेती करत आहेत. ते गावाचे सरपंचही आहेत. त्यांचे एकत्र कुटुंब असून कुटुंबात १९ सदस्य आहेत. गजानन यांचे भाऊ यशवंत म्हणाले आम्ही दादांना शेती कामातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि शेतातच त्यांचा निरोप समारंभ साजरा केला. नंतर गावातील अन्य १० ज्येष्ठ शेतकऱ्यांचा सन्मान करून दादांसह या सर्व शेतकरी मंडळींची बैलगाडीतून मिरवणूक काढली. या कुटुंबाची २५ एकर शेती आहे. मात्र दादांनी ६० वर्षे शेती काम केल्यावर आता त्यांना विश्रांती दिली पाहिजे असे आम्हाला वाटले.

Leave a Comment