५७०० वर्षापूर्वीही माणसे चघळत होती च्युइंगम


जगात बहुतेक सर्वानी कधी नां कधी च्युइंगम चघळले असणार. आता सिंगापूर सारख्या देशात च्युइंगमवर बंदी असली तरी च्युइंगम चघळण्याची माणसाची सवय ही अलीकडली नाही तर ५७०० वर्षापूर्वी म्हणजे पाषाण युगातील माणसेही च्युइंगम चघळत होती असे पुरावे संशोधकांना सापडले आहेत. द. डेन्मार्कच्या सीलथोलम या पुरातत्व जागी युनिव्हर्सिटी ऑफ कोपेनहेगन मधील संशोधकांना अशी एक वस्तू आढळली आहे की ज्याची कधी कुणी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नसावी.

संशोधकांना येथे एका महिलेच्या दाताच्या डीएनए मधून च्युइंगम सारख्या पदार्थाचे अस्तित्व सापडले आहे. त्यामुळे त्या काळातही च्युइंगम खाल्ले जात असावे असा निष्कर्ष काढला गेला आहे. मानवी अस्थीच्या शिवाय प्रथमच अन्य नमुन्यातून माणसाचे डीएनए सापडले आहेत असा दावा केला जात आहे.

या डीएनए वरून संशोधकांनी ज्या महिलेचे हे नमुने आहेत तिचे केस काळे, वर्ण काळा पण डोळे मात्र निळे असावेत असे निष्कर्ष काढले असून या प्राचीन महिलेला लोला असे नाव त्यांनी दिले आहे. ही महिला जेथे राहत होती तेथील लोक मासे पकडत असावेत शिवाय शिकार करत असावेत असेही मत मांडले गेले आहे. हे संशोधन नेचर जर्नल मध्ये प्रसिद्ध केले गेले आहे. संशोधकांनी भुर्जपत्राच्या झाडातील राळेचा नमुना तपासला तेव्हा पाषण युगातील मानवी आहार व त्याच्या तोंडातील जीवाणू यांचाही शोध घेतला. या जीवाणूमध्ये हजारो वर्षात कसा फरक पडत गेला तेही या निमित्ताने अभ्यासले गेले असे समजते.

Leave a Comment