येथे आहे निर्भयाचा दोस्त अवनिन्द्र


सध्या देशभरात निर्भया प्रकरणातील दोषी बलात्कारींना लवकरात लवकर फाशी चढवावे अशी मागणी एकमुखाने केली जात आहे. पतियाला उच्च न्यायालयाने फाशीची तारीख अद्याप जाहीर केलेली नसून ७ जानेवारीला या संदर्भात पुढची सुनावणी केली जाणार आहे. दरम्यान ही अघोरी घटना घडली तेव्हा निर्भयावरील अत्याचाराचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला तिचा मित्र अवनिन्द्र बद्दल काहीच ऐकू येत नाही. मात्र १२ डिसेंबर २०१२ च्या रात्री घडलेल्या या निंद्य प्रकाराबद्दल बोलताना अवनिद्रचे वडील भानुप्रताप पांडेय आजही गहिवरतात.

पांडेय व्यवसायाने वकील आहेत आणि ते गोरखपूर येथे राहतात. या भीषण घटनेनंतर अवनिद्रला काय भोगावे लागले हे सांगताना ते म्हणतात आजही नुसत्या आठवणीने आमचे डोळे भरून येतात. निर्भया तर गेली पण त्यानंतर अवनिद्रचे आयुष्य भयाण बनले आहे. गेली सात वर्षे तो दुसरेच आयुष्य जगतो आहे. क्षणाक्षणाला आपली मैत्री अपुरी राहिली अशी वेदना त्याला त्रास देते आहे. मी तिला वाचवू शकलो नाही, प्रत्येक क्षणी साथ देण्याचा वादा निभावू शकलो नाही या भावनेचे ओझे त्याच्या काळजावर आहे. सहा जणांच्या तावडीतून आपण तिला वाचवू शकत नाही हे जाणवले तेव्हापासूनच एक अपराधीपणाची भावना त्याच्यात कायम राहिली आहे.

या प्रकारानंतर तो दिल्ली किंवा गोरखपूर मध्ये राहिला असता तर पुढच्या आयुष्यात काहीच करू शकला नसता हे जाणवल्यावर त्याला महाराष्ट्रात पुण्यात पाठविले गेले होते. तेथे त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. मात्र सध्या तो परदेशात इंजिनिअर म्हणून एका खासगी कंपनीत काम करतो आहे. निर्भयावर अत्याचार करणाऱ्यांना फाशीच हवी अशीच त्याचीही मागणी आहे.

Leave a Comment