युद्धावर जाताना कुमाऊ रेजिमेंटचे जवान या देवीचा घेतात आशीर्वाद


उत्तराखंड ही देशाची देवभूमी मानली जाते. येथे बद्री, केदार, जागेश्वरधाम अशी अनेक प्राचीन तीर्थस्थळे आहेतच पण त्याचबरोबर अनेक शक्तीपीठे आणि असंख्य मंदिरे येथे आहेत. यातील अनेक मंदिरे काही रहस्ये त्याच्या उदरात बाळगून आहेत. त्यातील एक मंदिर म्हणजे काली मा चे मंदिर. हाट कालिका या नावाने ते प्रसिद्ध आहे. पीथोरागढच्या गंगोलीहाट मध्ये हे महाशक्तीपीठ आहे. देवदार वृक्षांनी हे मंदिर चारी बाजूनी घेरले गेले आहे.

या मंदिराचे पौराणिक महत्व आहे. स्कंदपुराणात मानसखंडात या देवीचे वर्णन आहे. या मंदिरात रात्री देवीची पालखी निघते त्यावेळी देवीचे गण, तिची आण बाण सेना त्यासोबत असते असा विश्वास आहे. त्याला कुणीही स्पर्श करू शकला तर त्याला दिव्य वरदान प्राप्ती होते असाही समज आहे. मा कालीचे हे विश्रांतीस्थान मानले जाते त्यामुळे मंदिरात तिचा बिछाना आहे. सकाळी मंदिर उघडले जाते तेव्हा हा बिछाना चुरगळलेला असतो असेही सांगतात. मातेची जो कुणी श्रद्धेने पूजा करेल त्याचे रोग, शोक आणि दारिद्र दूर होते असे भाविक सांगतात.


विशेष म्हणजे ही देवी भारतीय सेनेच्या कुमाऊ रेजिमेंटमधील सैनिकांचे श्रद्धास्थान आहे. कोणत्याही मोहिमेवर जाताना अथवा युद्धावर जाताना मातेचे अगोदर दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात. त्यामुळे या मंदिराच्या धर्मशाळेत नेहमीच कुणा नां कुणा आर्मी अधिकाऱ्याचे नाव नक्कीच दिसते. १९७१ च्या पाक युद्धानंतर कुमाऊ रेजिमेंटचे सुभेदार शेरसिंग यांच्या नेतृत्वाखाली महाकालीची मूर्ती स्थापन केली गेली. सेनेकडून स्थापन केली गेलेली ही पहिलीच मूर्ती आहे असे म्हणतात. १९९४ मध्ये याच रेजिमेंटने मंदिरात आणखी मोठी मूर्ती स्थापन केली आहे.

Leave a Comment