बटाटे, कांद्या पाठोपाठ साखरही महागणार


बटाटे कांदे तसेच डाळीमुळे महागाईचा तडका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत असतानाच आता रोजची गरजेची चहा कॉफीही नागरिकांसाठी कडू बनणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यंदा देशात चालू गळीत हंगामात साखर उत्पादनात घट झाल्याने बाजारात यंदा साखरेचे दर उच्चांक गाठतील असे संकेत मिळत आहेत. चालू गळीत हंगामात दीड महिन्यात साखर उत्पादन ३५ टक्के घटले आहे. फक्त उत्तर प्रदेशात उत्पादन वाढले असून बाकी महाराष्ट्र, कर्नाटक या प्रमुख साखर उत्पादक राज्यात उत्पादन घटले आहे.

चालू हंगाम २०१९-२० मध्ये झालेल्या साखर उत्पादनाची आकडेवारी समोर आली आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने बुधवारी ही आकडेवारी जाहीर केली त्यानुसार गत वर्षीच्या तुलनेत यंदा ४६ लाख टन साखर उत्पादन झाले असून ते गतवर्षीपेक्षा ३५ टक्के कमी आहे. १५ डिसेंबर पर्यंत देशात ४५.८१ लाख टन उत्पादन झाले असून गतवर्षी याच काळात ते ७०.५४ लाख टन होते. फक्त उत्तर प्रदेशात गतवर्षी पेक्षा २.३१ लाख टन जादा उत्पादन झाले असून ते २१.२५ लाख टन आहे.

गत वर्षी महाराष्ट्रात १५ डिसेंबर पर्यंत २९ लाख टन साखर उत्पादन झाले होते ते यंदा ७.६६ लाख टनांवर आले आहे तर कर्नाटकात गतवर्षीच्या १४ लाख टनांवरून ते १०.६२ लाख टनांवर आले आहे. यंदा पाउस लांबल्याने या दोन्ही राज्यात उसपेरणी एक महिना उशिरा झाल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment