देशातील मुस्लिम हे सुरक्षित आणि त्यांचे सर्व हक्क अबाधित


नवी दिल्ली – भारत हा बहुसंख्यांक लोकांमुळेच एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनला असून देशातील मुस्लिम हे सुरक्षित असून त्यांचे सर्व हक्क अबाधित असल्याचे मत केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केले. त्यांनी हे व्यक्तव्य देशभरात सुरू असलेल्या नागरिकत्व कायद्याविरोधी आंदोलनांबद्दल बोलताना केले आहे. कोणत्याही अफवांवर लोकांनी विश्वास न ठेवता, शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

भारतीय नागरिकत्व पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील अल्पसंख्यांकांना देणे, एवढाच या कायद्याचा (नागरिकत्व सुधारणा कायदा) उद्देश आहे. त्या देशांमधील अल्पसंख्यांकांसाठी हे ऐच्छिक आहे, त्यांना त्यांच्या देशात काही अडचण नसल्यास ते भारतात येणार नसल्याचे नक्वी यांनी स्पष्ट केले.

भारत देश हा धर्मनिरपेक्ष असून येथील बहुसंख्यांक असलेल्या हिंदूंनी तसे ठरवले आहे. ही त्यांची संस्कृती आहे. देशातील एकाही मुस्लिमाला कधीच इथे परकेपणा वाटला नाही, कारण हिंदूंनी सर्वांना सोबत घेऊन या देशाचा विकास केला असल्याचे नक्वी म्हणाले.

Leave a Comment