सामान्यांना बुलेट ट्रेन नाही तर तीन चाकी रिक्षाच परवडते


नागपुर – विद्यमान सरकार हे तीन चाकी रिक्षा सरकार असल्याचे काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. तसेच हे सरकार फार काळ टिकणार नसल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावरून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. सर्वसामान्यांचे आमचे हे सरकार आहे. सामान्यांना बुलेट ट्रेन नाही तर तीन चाकी रिक्षाच परवडते, असे म्हणत त्यांनी फडणवीस यांना टोला हाणला.

आम्हाला कमी बोलायचे पण काम जास्ती करायचे आहे. आम्हाला गती, प्रगती, अधोगती यामध्ये पडायचे नाही. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कायमची भाजपची पालखी वाहणार नाही असा शब्द दिला होता. सामना या वृत्तपत्राचा या ठिकाणी दाखला देण्यात आला होता. सामना या चित्रपटात ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ असे एक गाणे होते. गेले २५ वर्ष आम्ही पाठीवर ओझे घेऊन चाललो होतो. ते ओझे आता आम्ही उतरवले असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

शिवसेनेचा मुख्यमंत्री काँग्रेसच्या जीवावर बसवणार असा शब्द त्यांना दिला नव्हता. परंतु भाजपची पालखीही कायमची वाहणार नसल्याचे सांगितले होते. काम करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. चहापेक्षा किटली जास्त गरम असते असे कोणीतरी म्हटले होते. पंरतु किटली धरली जाणारी फडकीही आता गरम होऊ लागली असल्याचे म्हणत त्यांनी भाजपला टोला हाणला.

आता मंत्रालयात संत गाडगेबाबा यांचा उपदेश लावणार आहे. गाडगेबाबा म्हणायचे धर्म सांगायचा नसतो. जगायचा असतो. ते म्हणायचे धर्म ग्रंथात नसतो तो जीवनात असल्याचे यावेळी ठाकरे म्हणाले. त्यांनी यावेळी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही टोला हाणला. सुधीर तुम्ही अधीर होऊ नका, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा उल्लेख करत त्यांच्याकडून अर्थशास्त्र शिकायचे असल्याचे म्हटले. महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे आणि त्याचे अर्थशास्त्र शिकायचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

शरद पवार हे माझे राजकीय गुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. मी त्यांचे बोट धरून शिकलो. मग देवेंद्र फडणवीस आणि मोदी यांचे का पटत नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केला. सामनामधून करण्यात आलेली टीका दाखवण्यात आली. परंतु कौतुक केल्याचे दाखवण्यात आले नाही. राज्याची बदनामी मी होऊ देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment