ट्रम्प यांच्यावरील महाभियोग प्रस्तावाला मंजूरी


वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाला अमेरिकी संसदेच्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’मध्ये आज पार पडलेल्या मतदानात मंजुरी मिळाली आहे. या प्रस्तावाला सभागृहात २३० विरूद्ध १९७ मतांनी मान्यता मिळाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल तसेच संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. यानंतर याबाबत आता अमेरिकी संसदेच्या ‘सिनेट’मध्ये मतदान होईल.

जरी ट्रम्प यांच्या विरोधात प्रतिनिधींच्या सभागृहाने मत दिले असले, तरी ट्रम्प यांच्या बाजूने ‘सिनेट’ नक्कीच मत देईल असा विश्वास व्हाईट हाऊसने व्यक्त केला आहे. डोनाल्ड ट्रम्प या महाभियोगाच्या पुढील प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रतिनिधींच्या सभागृहात बहुमतात असलेला डेमोक्रॅटिक पक्ष, सिनेटमध्ये मात्र अल्पमतात असल्यामुळे व्हाईट हाऊसचा हा दावा खरा ठरण्याची शक्यता जास्त आहे.

Leave a Comment