वनडे इतिहासात प्रथमच दोन्ही कप्तान शून्यावर बाद


बुधवारी टीम इंडिया आणि वेस्ट इंडीज यांच्यात विशाखापट्टनम येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडियावर १०७ धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली. मात्र या सामन्यात दोन्ही टीमच्या कप्तानांना नको असलेले एक रेकॉर्डही नोंदविले गेले. वन डे सामन्यांच्या इतिहासात यावेळी प्रथमच दोन्ही संघाचे कप्तान पहिल्या चेंडूवर एकही धाव न काढता शून्यावर आउट झाले. टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली सहा वर्षानंतर प्रथमच पहिल्याच बॉलवर आउट झाला.

बुधवारी टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या १५९ आणि केएल राहुलच्या १०२ धावांच्या जीवावर पाच विकेट गमावून ३८७ धावा केल्या. कोहली तीन नंबरवर खेळायला आला तेव्हा पोलार्डने फेकलेला स्लो बाउंसर त्याच्या लक्षात आला नाही आणि शॉट खेळण्याच्या नादात विराटने मिडविकेटला रोस्टनकडे सोपा झेल दिला.

वेस्ट इंडीजचा कप्तान पोलार्ड चार विकेट गमावल्यावर संघाच्या १९२ धावा झाल्या असताना खेळपट्टीवर आला. मात्र पहिल्याच चेंडूवर विकेटमागे ऋषभ पंतने त्याचा झेल घेतला. या दोन्ही संघातील अंतिम सामना २२ डिसेम्बरला कटक येथे होणार आहे.

Leave a Comment