लॉटरीवर सरसकट २८ टक्के जीएसटी


येत्या मार्चपासून राज्य आणि खासगी लॉटरीवर २८ टक्के सरसकट जीएसटी आकारण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या ३८व्या जीएसटी परिषदेत बहुमताने घेण्यात आला. विशेष म्हणजे आत्तापर्यंतच्या सर्व ३७ बैठकीत घेतले गेलेले निर्णय एकमताने घेण्यात आले होते मात्र लॉटरी जीएसटी आकारणीचा निर्णय मतदान घेऊन घेतला गेला. महसूल सचिव अजयभूषण पांडेय यांनी या संदर्भात माहिती दिली.

लॉटरीवर यापूर्वी दोन प्रकारे जीएसटी लागू केला जात होता. राज्य लॉटरीची विक्री राज्यातच केली गेली असेल तर त्यावर १२ टक्के जीएसटी तर राज्याबाहेर होणाऱ्या विक्रीवर २८ टक्के जीएसटी आकाराला जात होता. सरकारी तसेच खासगी सर्व प्रकारच्या लॉटरीवर सरसकट २८ टक्के जीएसटी आकाराला जावा या बाजूने २१ राज्यांनी समर्थन दिले.

लॉटरी जीएसटी २८ टक्के आकारणीचा निर्णय घेताना मतदान का घेतले याचे उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, आत्तापर्यंत घेतले गेलेले निर्णय एकमताने घेतले गेले असले तरी तसा कोणताही नियम नाही. लॉटरी निर्णयावर मतदान घेतले जावे असा प्रस्ताव केरळचे अर्थमंत्री थॉमस इसक यांनी मांडला होता.

Leave a Comment