या शिवमंदिरात जाण्यासाठी १६ वेळा पार करावी लागते एकच नदी


छत्तीसगढच्या राजनांदगाव जिल्यातील घनघोर जंगलात पहाडावरील एका गहन गुहेत असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी एकच नदी १६ वेळा पार करावी लागते. हे अनोखे ठिकाण निर्जन आहे आणि वर्षातून एकदाच म्हणजे अक्षयतृतीयेनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी येथे भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. या ठिकाणी येण्याचा मार्ग अतिशय खडतर आहेच पण हा सर्व प्रदेश नक्सली भाग म्हणून ओळखला जातो त्यामुळेही येथे अन्य वेळी कुणी फारसे येत नाही असे सांगतात.


या गुहेत जाण्याचा मार्ग इतका वळणदार आणि खडतर आहे की एकच नदी अनेकदा ओलांडावी लागते. गुहेतील शिवलिंग स्वयंभू असल्याची भावना असून त्याचे नाव मंदीपबाबा असे आहे. पावसाळ्याच्या दिवसात या गुहेत पाणी भरते आणि थंडीच्या दिवसात शेती कामे असतात म्हणून या ठिकाणी जाता येत नाही. हा सर्व मार्ग अतिशय खडतर असून अनेकदा पहाड चढावा लागतो, उतरावा लागतो आणि गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी किमान आठ तास चालावे लागते. गुहेत आत जाउन प्रत्यक्ष शिवलिंग दर्शन घेण्यासाठी आणखी ५-६ तासाचा अवधी लागतो. गुहेचे प्रवेशद्वार अगदी अरुंद असले तरी आत मध्ये एकावेळी ५००-६०० भाविक उभे राहू शकतात.

अक्षयतृतीयेनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी सर्वप्रथम ठाकूर टोला राजवंशातील लोक येथे पूजा करतात आणि मग सर्वसामान्य भाविकांना दर्शन घेता येते. गुहेला आतमध्ये अनेक फाटे आहेत त्यामुळे हरविले जाण्याची भीती असते. येथील एक साधू सांगतात की या गुहेतुन एक मार्ग प्रसिद्ध अमरकंटक या स्थळी जातो. अमरकंटक येथून ५०० किमी दूर आहे. गुहा अतिशय अंधारी असून आतमध्ये दिवे उजळून प्रकाश केला जातो.

Leave a Comment