ब्रिटीश संसदेत गीतेवर हात ठेऊन या खासदारांनी घेतली शपथ


भारतीय वंशाच्या दोन खासदारांनी मंगळवारी ब्रिटीश हाउस ऑफ कॉमन्समध्ये भगवद गीतेवर हात ठेऊन खासदारपदाची शपथ घेऊन सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. ब्रिटीश कॅबिनेट मंत्री अलोक शर्मा आणि ट्रेझरी मुख्य सचिव ऋषी सनक यांनी यातून ब्रिटीश संसदेतील वाढत्या विविधतेचे दर्शन घडविले असे मानले जात आहे.

मंगळवारी नवीन हाउस ऑफ कॉमन्स संसद सदस्यांचा शपथविधी झाला तेव्हा पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यासह अनेकांनी बायबलवर हात ठेऊन शपथ घेतली. मात्र ५२ वर्षीय अलोक शर्मा यांनी गीतेवर हात ठेऊन शपथ घेतली. त्यांचा जन्म आग्रा येथील असून ते आंतरविकास सचिव आहेत. ३९ वर्षीय ऋषी सुनक इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचे जावई आहेत आणि ते सलग तिसऱ्या वेळी रिचमंड योर्कशायर मधून निवडून आले आहेत. या दोघांनी गीतेच्या प्रतीवर हात ठेऊन सर्वशक्तिमान ईश्वराला साक्षी ठेऊन महाराणी एलिझाबेथ आणि त्यांचे उत्तराधिकारी यांच्याप्रती निष्ठा आणि विश्वास ठेऊ आणि त्यासाठी ईश्वर आम्हाला मदत करेल अशी शपथ घेतली.

हाउस ऑफ कॉमन्स आणि हाउस ऑफ लॉर्ड्स मध्ये राजगादीशी निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्याची परंपरा आहे मात्र त्यासाठी कोणते पवित्र ग्रंथ वापरावेत याचे स्पष्ट नियम नाहीत. त्यामुळे शर्मा आणि सुनक यांनी हिंदूंचा पवित्र ग्रंथ गीतेवर हात ठेऊन शपथ घेतली.

Leave a Comment