व्हॉट्सअॅपमधील ‘या’ बगमुळे कायमस्वरुपी डिलीट होतात मेसेज


सातत्याने आपल्या युजर्सना नवनवे फीचर्स लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअॅप देत असले तरी त्यातील अनेक उणिवादेखील समोर येत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आता पुन्हा एकदा एक धोकादायक ‘बग’ असल्याचे निदर्शानास आल्यामुळे केवळ एक मेसेज पाठवून हॅकर्स अ‍ॅप क्रॅश करु शकतात. अ‍ॅप एकदा क्रॅश झाल्यानंतर अ‍ॅप अनइंस्टॉल करुन पुन्हा डाउनलोड करण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नसेल.

हा बग सायबर सिक्युरिटी फर्म चेकपॉइंटच्या तज्ज्ञांनी शोधला असून एकाचवेळी अनेक स्मार्टफोनमधील अ‍ॅप ग्रुप चॅटमध्ये टाकलेल्या एका मेसेजमुळे क्रॅश होऊ शकतात एवढा खतरनाक हा बग असल्याचं चेकपॉइंटच्या तज्ज्ञांनी म्हटले असून याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, कारण अनेक लोकांसाठी संपर्क साधण्याचा किंवा संभाषणाचा व्हॉट्सअ‍ॅप मुख्य मार्ग आहे.

व्हॉट्सअॅपचा जगातील 150 कोटींहून अधिक युजर्स वापर करतात, तर जगात 10 कोटींहून अधिक ग्रुप्स आहेत. दररोज व्हॉट्सअ‍ॅपद्वारे जवळपास 65 अब्ज मेसेज पाठवले जातात. एवढ्या मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे एकाचवेळी ग्रुपमध्ये केवळ एक मेसेज टाकून अनेक स्मार्टफोन्सना लक्ष्य केले जाऊ शकते. ग्रुप मेंबर्सचे अ‍ॅप ग्रुप ओपन करताच क्रॅश होईल. विशेष म्हणजे ग्रुप चॅट क्रेश झाले की, त्यासोबत चॅट हिस्ट्री सुद्धा डिलीट केली जाते.

अ‍ॅप जोपर्यंत अनइंस्टॉल केले जात नाही, अ‍ॅप तोपर्यंत क्रॅश होत राहिल. अॅप पुन्हा इंस्टॉल केल्यानंतर युजर्स ग्रुप चॅटमध्ये जाऊ शकणार नाहीत किंवा हिस्ट्री देखील पाहू शकणार नाहीत. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपला या बगबाबत माहिती देण्यात आल्यानंतर हा बग कंपनीने फिक्स केला आहे. तसेच अ‍ॅप अपडेट करण्याचे आवाहन कंपनीकडून युजर्सना करण्यात आले आहे.

इंडियन कम्प्यूटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीमने काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक इशारा दिला होता. अँण्ड्राइड आणि आयओएसवर व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांना एका बगच्या माध्यमातून लक्ष्य केले जात आहे असे त्यांनी म्हटले होते.

Leave a Comment