एनकाऊंटरमध्ये मारले गेलेल्या आरोपींनी यापूर्वीही केली होती 9 महिलांची बलात्कार करुन हत्या?


हैदराबाद : हैदराबाद एनकाऊंटरमध्ये मारले गेलेल्या आरोपींनी याआधी नऊ महिलांची बलात्कार करुन निर्घृण हत्या केल्याचे खळबळजनक वृत्त समोर येत आहे. नऊ महिलांवर चारपैकी दोघा आरोपींनी बलात्कार करुन त्यांना जिवंत जाळल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

सध्या कर्नाटकात सायबराबाद पोलिस तळ ठोकून असून त्यांच्याकडून नऊ केसेसची सत्यता पडताळून पाहिली जात आहे. कर्नाटक-तेलंगणा सीमेवर हे कथित बलात्कार झाल्याची माहिती आहे. पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पुरावे गोळा करत आहेत. पोलिसांसोबत सहा डिसेंबरला झालेल्या चकमकीत हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपी ठार झाले होते.

आणखी काही बलात्कार आणि हत्यांची आरिफ आणि चेन्‍नाकेशवुलु या दोघांनी कबुली दिल्याचा दावा केला जात आहे. हे प्रकार तेलंगणाच्या संगारेड्डी, रंगारेड्डी, मेहबूबनगर आणि आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागात घडल्याची माहिती आहे. शरीरविक्रय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी यांचाही यामध्ये समावेश आहे.

हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊण्टर करण्यात आले होते. आरिफ, शिवा, नवीन आणि चिन्नाकेशवुलू हे चारही आरोपी हैदराबाद पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, पोलिसांनी त्यावेळी केलेल्या गोळीबारात ते जागीच ठार झाले. पण ही चकमक खरी आहे की बनावट, यावरुन सध्या गदारोळ सुरु आहे.

Leave a Comment