टीम इंडियाचा विंडीजसमोर 388 धावांचा डोंगर


विशाखापट्टणम : दोन्ही सलामीवीरांच्या खणखणीत शतकांच्या जोरावर विशाखापट्टणममध्ये टीम इंडियाने 387 धावांचा डोंगर रचला असून वन डे कारकीर्दीतील 28वे शतक रोहित शर्माने साजरे केले. तर तिसरे शतक लोकेश राहुलने ठोकले. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 227 धावांची भागीदारी रचली. या दोघांची शतके आणि शेवटी श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली. सलग दुसऱ्या सामन्यात कर्णधार विराट कोहली अपयशी ठरला. तो शून्यावर बाद झाला.

कायरन पोलार्डने दुसऱ्या वन-डे सामन्यातही नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पोलार्डचा हा निर्णय यावेळी योग्य ठरला नाही. दोन्ही सलामीवीर रोहित आणि राहुलने दमदार खेळी करत पहिल्या विकेटसाठी 227 धावांची भागीदारी रचली. लोकेश राहुल शतक झळकावल्यानंतर अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने 104 चेंडूत राहुलच्या 102 धावा केल्या. राहुलने या शतकी खेळीत 8 चौकार आणि 3 षटकार ठाकले. यानंतर आलेला विराट शून्यावर बाद झाला. यानंतरही रोहितची फटकेबाजी सुरुच राहिली. त्याने दीडशतक ठोकल्यानंतर तो बाद झाला. शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर रोहित माघारी परतला. त्याने 138 चेंडूत 159 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 17 चौकार आणि 5 षटकार ठोकले.

त्याच्या जोडीला आलेल्या श्रेयस अय्यरने देखील तडकाफडकी खेळी करत अर्धशतक ठोकले. 49 व्या षटकात श्रेयस अय्यर बाद झाला. शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर शाई होपने अय्यरचा झेल घेतला. श्रेयसने 32 चेंडूत 53 धावांची खेळी केली. या अर्धशतकी खेळीत 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे. 16 चेंडूत ऋषभ पंतने देखील 39 धावांची तडकाफडकी खेळी केली. किमो पॉलच्या गोलंदाजीवर निकोलस पूरनने त्याचा झेल घेतला. शेवटी आलेल्या केदार जाधवने 10 चेंडूत 16 धावा करत भारताची धावसंख्या 387 वर पोहोचवली.

Leave a Comment