नवी दिल्ली – मंगळवारी हैदराबाद एन्काऊंटरविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून हैदराबादमध्ये पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. पोलीस एन्काऊंटरमध्ये हे चारही जण मारले गेले होते. या एन्काऊंटरच्या चौकशीची मागणी मानवाधिकार समितीतर्फे करण्यात आली होती.
हैदराबाद एन्काऊंटरविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
तेलंगणा उच्च न्यायालयात यासंबंधी याचिका दाखल करण्यास सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या नेतृत्वाखालील पीठाने कार्यकर्ते के. सजाया यांना सांगत सर्वोच्च न्यायालयात आलेली याचिका फेटाळली. तेलंगणा उच्च न्यायालयासमोरच या एन्काऊंटरसंबंधातील पुरावे सादर करावेत, असे या पीठाने म्हटले.
हैदराबादमध्ये पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. तसेच, तिचा मृतदेह जाळून टाकला होता. २७ नोव्हेंबरला ही घटना हैदराबादमधील शमसाबाद येथे घडली होती. दुसऱ्या दिवशी पोलिसांना तिचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. मोहम्मद आरिफ, नवीन, शिवा आणि चेन्नाकेशावुलू यांना या प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांतच हे चारही जण पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाले होते. यानंतर विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
या एन्काऊंटरच्या चौकशीची मानवाधिकार समितीतर्फे मागणी करण्यात आली होती. तसेच, या एन्काऊंटरविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. यानंतर न्यायालयाने ३ सदस्यीय चौकशी आयोगाची स्थापना करण्याचे आदेश मागील आठवड्यात दिले होते.