दीडशतकासह रोहितने अनेक विक्रम केले आपल्या नावे


विशाखापट्टणम: भारताच्या सलामीवीर रोहित शर्माने शानदार दीडशतकी खेळी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केली. रोहितने १०७ चेंडूत एकदिवसीय सामन्यातील आपले २८वे शतक झळकावले. रोहितने या शतकासह अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले. पण रोहित १५९ धावांवर बाद झाला.

विंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव झाल्यानंतर विशाखापट्टणम येथे सुरु असलेला सामना भारतासाठी ‘करो वा मरो’ सारखा आहे. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा कर्णधार पोलार्डने प्रथम भारताला फलंदाजीसाठी बोलवले. भारतीय डावाची रोहित शर्मा आणि एल.के.राहुल यांनी सुरुवात केली. या दोघांनी सावधपणे खेळ केला आणि धावफलक हलता ठेवला.

राहुलने सुरुवातीला अर्धशतकपूर्ण केले त्यापाठोपाठ रोहितने देखील ५० धावा पूर्ण केल्या. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी शतकी भागिदारी केल्यानंतर रोहितने धावांचा वेग वाढवला. रोहितने १०७ चेंडूत ३ षटकार आणि १२ चौकारांसह १०० धावा केल्या. या शतकासह रोहितने काही विक्रम केले.

रोहितचे २०१९मधील हे ७वे शतक ठरले. रोहितने एका वर्षात सर्वाधिक शतक करण्याबाबत डेव्हिड वॉर्नर आणि सौरव गांगुली यांच्याशी बरोबरी केली. वॉर्नरने २०१६ तर गांगुलीने २०००मध्ये एका वर्षात सात शतक झळकावले होते. या क्रमवारीत सचिन अव्वल स्थानी आहे. त्याने १९९८मध्ये एका वर्षात नऊ शतके केली होती.

एकदिवसीय सामन्यामधील रोहित शर्माचे हे २८वे शतक ठरले. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतक करण्याबाबत त्याने श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याशी बरोबरी केली. तर दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमला याला मागे टाकले. या सामन्यात रोहितने २०१९ या वर्षात एकदिवसीय सामन्यामधील सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत अव्वल स्थानी झेप घेतली. कर्णधार विराट कोहलीला त्याने मागे टाकले.

Leave a Comment