पक्ष सोडण्याच्या शक्यता नाथाभाऊंनी नाकारल्या


नागपुर – ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात बरीच उलथापालथ झाली, हे आपण सर्वांनीच पाहिले आहे. त्यातच भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली होती. एकनाथ खडसे यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंढे यांच्या जयंती निमित्त भगवानगडावर आयोजित केलेल्या मेळाव्यात लक्षवेधीत विधान केल्यामुळे खडसे भाजप सोडणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

तसेच काल त्यांनी नागपूरात जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांनी अधिक जोर धरला. पण आता या चर्चेवर खडसे यांनी आपली प्रतिक्रिया देत पक्ष सोडण्याचा सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

12 डिसेंबर रोजी बीड येथे भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्ताने एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. एकनाथ खडसे यांनी त्यावेळी पक्षातील नेत्यांच्या विरोधात भाषण केले होते. दरम्यान, पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत. पण, माझा काही भरवसा नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. यातच नागपूरमध्ये एकनाथ खडसे दाखल झाले होते. यानंतर भाजपला आणखी धक्का लागेल का ? अशी शक्यता व्यक्त जात होती. पण, मी माझ्या कामासाठी नागपूरला आलो आहे. तसेच मी शरद पवारांची भेट घेतली नसल्याचे म्हणाले आहेत. तसेच आपण भाजप सोडणार नसल्याचे सांगून सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधला होता. वरिष्ठांकडून मन वळविण्याचा प्रयत्न झाला का? असा प्रश्न एका पत्रकारांनी विचारला. त्यावर खडसे म्हणाले की, मी कुठलाही निर्णय घेतला नसल्यामुळे मन वळविण्याचा प्रश्नच येत नसल्याचे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

Leave a Comment