भिकेचे डोहाळे ; जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळ गहाण ठेवणार इम्रान खान


इस्लामाबाद – आपला शेजारी देश असलेला पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईवर आली आहे. आता रोजचा खर्च चालविण्यास आणि कर्मचार्‍यांचे पगार देण्यासाठीही पाकिस्तान सरकारकडे पैसे शिल्लक राहिले नाहीत. पंतप्रधान इम्रान खान यांनी या महत्वाच्या समस्या दूर करण्यासाठी कराचीचे जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळ गहाण ठेवून त्यावर कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार तीन बँकांकडून या बदल्यात 452 कोटी डॉलर्स कर्ज घेईल. 70 हजार कोटी पाकिस्तानी चलनात ही रक्कम आहे. जिन्ना विमानतळ हे पाकिस्तानमधील सर्वात मोठे आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे विमानतळ आहे.

या विमानतळाकडे देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळ म्हणूनही पहिले जाते. या विमानतळाद्वारे 2017-18 मध्ये सुमारे 67 लाख प्रवाश्यांनी प्रवास केला होता. मीजान बँक, बँक ऑफ अल्फाला आणि दुबई इस्लामिक बँक यांच्याकडे विमानतळाची 1150 हेक्टर जमीन तारण म्हणून ठेवली जाईल. पण त्याविषयी काहीही सांगण्यास नकार पाकिस्तान सरकारच्या प्रवक्त्याने दिला आहे. मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेण्याची पाकिस्तान सरकारची ही पहिलीच वेळ नाही. नवाज शरीफ आणि परवेझ मुशर्रफ यांच्या काळात सरकारने जागतिक बँक, आयएमएफ आणि इतर बाह्य संस्थांकडून कर्जासाठी पीटीव्ही आणि रेडीओ, पाकिस्तानचे रस्ते आणि इमारती तारण ठेवल्या होत्या.

माजी गृहमंत्री आणि संसदेचे उच्च सभागृह सदस्य रहमान मलिक यांचे म्हणणे आहे की, इम्रान खान यांचे अपयश विमानतळ गहाण ठेवण्याच्या निर्णयामुळे दिसून येते. जेव्हा नेत्याकडे दृष्टी नसते तेव्हा अशा गोष्टी घडतात. इम्रान खान यांची महागाई कमी करणे आणि अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे ही सर्वात मोठी कसोटी आहे.

Leave a Comment