निर्भया प्रकरणातील दोषी अक्षयची पुनर्विचार याचिका फेटाळली


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी अक्षय सिंगची पुनर्विचार याचिका फेटाळल्यामुळे अक्षय सिंहला फाशी होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. बुधवारी अक्षयच्या पुनर्विचार याचिकेवर तीन सदस्यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी ही याचिका फेटाळून लावत अक्षयची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने याआधीच या प्रकरणातील अन्य आरोपी मुकेश, पवन गुप्ता, विनय शर्मा यांच्या फेरविचार याचिका फेटाळल्यामुळे आता या चारही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने सांगितले आहे की, यापूर्वी बचाव पक्षाद्वारे दिलेले युक्तिवाद सुनावण्यात आले आहेत. याचिकेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा कोणताही आधार सापडला नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर निर्भयाच्या दोषींना फाशीच्या शिक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे.

याप्रकरणाचा तपास आणि पीडितेच्या जबाबावर अक्षयचे वकील एपी सिंह यांनी सुनावणी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, शेवटच्या जबाबामध्ये पीडितेने अक्षय किंवा इतर दोषींचे नाव घेतले नाही. मीडिया आणि राजकिय दबावामुळे अक्षयला शिक्षा देण्यात आली. तो निर्दोष आणि गरीब आहे. भारत अहिंसेचा देश आहे आणि फाशी मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. यावर, न्यायालयाने सांगितले की तुम्ही ठोस आणि कायदेशीर तथ्ये ठेवावीत. आमच्या निर्णयामध्ये काय उणीव आहे आणि का याचा पुनर्विचार करावा?, असा सवाल केला.

Leave a Comment