डॉ. श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड


सोर्स- टीओआय
नटसम्राट हे अजरामर नाटक ज्यांना समोर ठेऊन लिहिले गेले ते महान अभिनेते डॉ.श्रीराम लागू यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास निधन झाले. गेले काही दिवस त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र दोन दिवसांपूर्वी अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. लागू यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांचे पार्थिव दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात चाहत्यांच्या दर्शनसाठी ठेवले जाणार आहे. लागू यांच्या मागे त्यांच्या पत्नी अभिनेत्री दीपा लागू आहेत.

श्रीराम लागू यांनी १०० वर हिंदी मराठी चित्रपटात भूमिका केल्या होत्या. त्यांनी मराठी, हिंदी आणि गुजराथी भाषेत ४० नाटके केली होती तर सुमारे २० मराठी नाटकांचे दिग्दर्शन केले होते. लहानपणापासून त्यांना डॉक्टर बनण्याची इच्छा होती आणि त्याप्रमाणे त्यांनी एमबीबीएस आणि डीजीओ पदवी मिळवून काही काळ स्वतंत्र व्यवसाय केला होता मात्र डॉक्टरीचे शिक्षण घेत असतानाचा त्यांना अभिनयाची गोडी लागली आणि त्यानंतर त्यांनी १९६९ मध्ये अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. नटसम्राट, हिमालयाची सावली ही त्यांची नाटके तुफान गाजली. सामना, सिंहासन, पिंजरा या मराठी चित्रपटातील भूमिकाही खूप गाजल्या. रंगभूमीचे चालते बोलते विद्यापीठ अशी ख्याती त्यांनी मिळविली होती. ते अतिशय अभ्यासू आणि सशक्त अभिनेते होते. अनेक पारितोषिकांनी त्यांना गौरविले गेले होते.

लागू यांचा जन्म सातारा येथे १६ नोव्हेंबर १९२७ साली झाला होता. ते परखड आणि स्पष्ट विचारांचे होते. सामाजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता आणि अंधश्रद्धा निर्मुलन संघटनेशी ते जोडलेले होते. लमाण हे त्यांचे आत्मचरित्र खूप गाजले त्याचबरोबर त्यांची अन्य काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा मुलगा तन्वीर याचे अपघाती निधन झाल्यावर त्यांनी तन्वीर सन्मान सोहळा सुरु केला होता. हा कार्यक्रम गेल्याच आठवड्यात पार पडला तेव्हा लागू या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांचा हा शेवटचा कार्यक्रम ठरला.

Leave a Comment