काश्मिरी महिलांची उत्पादने पेटीएमवर विक्रीला


जम्मू काश्मीर मधील महिलांनी बनविलेली स्थानिक उत्पादने पेटीएमवर विक्रीसाठी उपलब्ध केली जात असून त्यासाठी खादी ग्रामोद्योग आणि पेटीएम यांच्यात करार करण्यात आला आहे. या नव्या करारामुळे जम्मू काश्मीरच्या महिलांना रोजगार मिळणार आहे शिवाय महिला सशक्तीकरणासाठी त्याचा उपयोग होणार आहे. याची सुरवात काश्मिरी रुमाल विक्रीपासून करण्यात येत असून त्यानंतर महिलांनी बनविलेली अन्य उत्पादने विक्री साठी ठेवली जाणार आहेत.

या संदर्भात रस्ते वाहतूक आणि राज्यरस्ते मंत्री नितीन गडकरी म्हणाले, जम्मू काश्मीरच्या आतंकवादी प्रभावित क्षेत्रातील महिलांपासून या उपक्रमाची सुरवात केली गेली आहे. या महिलांनी बनविलेले रुमाल विकले जाणे ही त्यांच्यासाठी रोजगार संधी आहे शिवाय दहशतवादाला आळा घालण्याचा तो एक मार्ग आहे. कारण अपुरी कमाई हेही अनेक तरुण दहशतवादाकडे वळण्यामागच्या अनेक कारणांतील एक आहे. रोजगार मिळाला तर दहशतवादाच्या दिशेने जाणारे अनेक त्यापासून दूर राहतील.

खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष विजय कुमार सक्सेना म्हणाले, सुरवातीला रुमाल बनविण्यासाठी खादीचे कापड पुरविले जाणार आहे. आणि २ कोटी रुमाल पेटीएमच्या माध्यमातून विक्रीसाठी ठेवले जाणार आहेत. देशभरात असे ५ कोटी रुमाल विकले जातील. पंतप्रधान रोजगार योजनेखाली ८६ हजार रोजगार दिले गेले आहेत आणि लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी १२० केंद्र सुरु केली गेली आहेत. मध आणि पॉटरी विभागातही चांगले काम सुरु झाले आहे. नगरोटा या आतंकवाद पिडीत भागात १५० महिला या उद्योगात सामील झाल्या असून येथेच ५ कोटी रुमाल बनविले जात आहेत.

या रुमालांसाठी १ कोटी २५ लाख मीटर कपडा लागणार असून २५ लाख किलो कापूस वापरला जाणार आहे. त्यातून कारागिरांना ८८ कोटी रुपये मिळणार आहेत.

Leave a Comment