पंकजा मुंडेंचे कोड्यात टाकणार ट्विट


मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या वक्तव्यावरून राज्यात प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या भाजपने हिवाळी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेतली. भाजपकडून सातत्याने राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणीही केली जात आहे. भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सावरकरांच्या या मुद्यावर कोड्यात टाकणार ट्विट केले आहे. पण, त्यांनी या माध्यमातून स्वपक्षीयांनाच सुनावले आहे की, सरकारला? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत झालेल्या सभेत स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. राज्यातील भाजप राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर आक्रमक झाली. त्याची झलक सोमवारपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात बघायला मिळाली. भाजप आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने करत राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. तसेच सभागृहातही यावरून बराच गदारोळ झाला.


भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरकर वादावर ट्विट करून आपली भूमिका मांडली आहे. “सागरा प्राण तळमळला” या देशात तरुणांना काय हवंय… १९४७ पूर्वी स्वातंत्र्य हवे होते. आता स्थैर्य हवे आहे. महात्म्यांचा अपमान त्यांचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केल्याने होतोच. प्रचंड संतापही होतो… सर्वांना होतो. त्यांच्या नावाच्या राजकारणाने पिडाही होते. कधी आपण संवेदनशील होऊन देशाच्या पुढील पिढीसाठी योगदान देणार? जसे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले..,” असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

Leave a Comment