बांगलादेशाचे परराष्ट्रमंत्री म्हणतात; फुकटचे खाण्यासाठी आमच्या देशात येतात भारतीय


ढाका : बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री डॉ. एके अब्दुल मोमेन यांनी बांगलादेशात भारतीय फुकटचे खाण्यासाठी येत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षा बांगलादेशची अर्थव्यवस्था चांगली असल्यामुळे त्यांच्या देशात भारतीय घुसखोरी करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी भारत-बांगलादेश संबंध गोड असल्याचे वर्णन केले. सध्या त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर टीका होत आहे. मोमेन म्हणाले की, भारतीय येथे काही दलालांच्या मदतीने बेकायदेशीरपणे वास्तव्य करत आहेत ज्यांना लवकरच देशाबाहेर काढले जाईल.

ते पुढे म्हणाले की, आमच्या देशाची स्थिती खूप चांगली असल्यामुळे बांगलादेशात भारतीय घुसखोरी करत आहेत. आमची आर्थिक अवस्था चांगली आहे. येथे येणाऱ्या लोकांना लगेच नोकरी मिळते. सगळ्यात महत्त्वाचे गरीबांना फुकट जेवण मिळते. पत्रकारांनी मोमेन यांना बांगलादेशात भारतीयांच्या बेकायदेशीर प्रवेशावर प्रश्न विचारला असता त्यांनी हे उत्तर दिले आहे.

भारतीय या सगळ्या गोष्टीमुळे बांगलादेशात येण्यासाठी उत्सुक असतात. आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारतापेक्षा जास्त क्षमता असून भारतामध्ये बेरोजगारी आहे म्हणून लोक आमच्या येथे काम करण्यासाठी येतात. अनेक दलाल आणि तस्कर भारतीयांना बांगलादेशात तुम्हाला मोफत भोजन मिळेल, असे आमिष दाखवतात.

बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री पुढे म्हणाले, वारंवार भारत सरकार सांगत आहे की, बांगलादेशात ते कोणालाही ढकलत नाही. आम्ही असेही म्हटले आहे की, जर कोणताही बांगलादेशी भारतात अवैधपणे राहत असेल तर आम्हाला कळवा आम्ही त्यांना आमच्या देशात परत आणू. रविवारी ढाका इथे भारतीय उच्चायुक्तांच्या अधिकाऱ्यांशी डॉ मोमेन यांनी भेट घेतली आणि द्विपक्षीय विषयांवर चर्चा केली. या बैठकीत बांगलादेशात भारतीयांचे बेकायदेशीर प्रवेश आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यांचा समावेश होता.

मोमेन भारत-बांगलादेश संबंधांविषयी म्हणाले, या दोन्ही देशामध्ये चांगले संबंध असल्यामुळे काळजी करण्यासारखी काहीच गोष्ट नाही. बांगलादेश-भारत संबंध सर्वात सुखद आणि चांगले आहेत. मायदेशी परतण्याचा बांगलादेशातील नागरिकांना अधिकार आहे. पण येथे इतर देशातील लोक बेकायदेशीरपणे राहत असतील तर आम्ही त्यांना येथून काढून टाकू असेही मोमेन म्हणाले. दरम्यान, मोमेने यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केल्याचा नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाशी काही संबंध असल्याचे नाकारले. भारत दौरा विजय दिनाच्या उत्सवामुळे रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment