सचिनचा शोध संपला, हवा असलेला वेटर मिळाला


सोर्स एनडीटीव्ही
सचिन तेंडूलकरने रविवारी ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर करून त्याला चेन्नई मध्ये भेटलेल्या एका वेटरला पुन्हा भेटण्याची इच्छा असल्याचे जाहीर करून सोशल मिडिया युजरना त्याला शोधण्यासाठी मदत करण्याचे जे आवाहन केले होते त्याचा फायदा झाला आहे. सचिनला या वेटरचा ठावठिकाणा मिळाला आहे. ताज कोरोमंडल हॉटेल मधील या वेटरने सचिन चेन्नई मध्ये एका कसोटी मालिकेत खेळत असताना त्याला त्याच्या एल्बो गार्ड संबंधी एक सल्ला दिला होता आणि त्याचा खूप फायदा सचिनला झाला होता. सचिनने त्याचा एल्बो गार्ड त्यानंतर रीडिझाईन करून घेतला होता. सोमवारी गुरुप्रसाद नावाच्या या माणसाचा ठावठिकाणा मिळाला असून तो चेन्नईचाच आहे.

एएनआयच्या बातमीनुसार गुरुप्रसाद सचिनचा त्याच्या भेटीचा निरोप मिळाल्यावर फारच उल्हासित झाला असून सचिनच्या आमंत्रणाबाबत प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, वास्तविक कोणत्याही सेलेब्रिटीचे चाहते त्याला भेटण्याची प्रतीक्षा करत असतात इथे मलाच भेटण्यासाठी हा महान खेळाडू उत्सुक आहे हे ऐकून खूप आनंद वाटतोय.

त्यावेळची आठवण सांगताना गुरुप्रसाद म्हणाले, त्यावेळी मी सिक्युरिटी गार्ड म्हणून ताज कोरोमंडल मध्ये काम करत होतो. सचिन त्याच्या खोलीतून बाहेर आला तेव्हा लिफ्ट पाशी मी त्याची सही घेतली आणि कित्येक दिवस माझ्या मनात असलेली गोष्ट सचिनला सांगितली. मी नेहमी पाहत होतो की सचिन जो एल्बो गार्ड वापरत होता त्यामुळे त्याचे मनगट योग्य दिशेने फिरत नव्हते व त्यामुळे तो बरेचदा आउट होत होता. सचिनला मी माझी शंका बोलून दाखविली होती पण इतक्या छोट्या सल्ल्याची त्याला आजही आठवण आहे हे पाहून भरून येतेय. सचिनची भेट व्हावीच पण माझ्या कुटुंबासमवेत त्याने थोडा वेळ घालवावा अशी माझी इच्छा आहे.

Leave a Comment