विंटेज कार्स साठी विशेष नंबर प्लेट मिळणार


जुन्या विंटेज कार्स शौकिनांसाठी एक चांगली बातमी आहे. सरकार ५० वर्षाहून जुन्या विंटेज कार्ससाठी नवी नियमावली लवकरच लागू करणार असून त्याला अंतिम रूप देण्याचे काम सुरु आहे. नव्या नियमावलीप्रमाणे या कार्सना वाहन स्क्रँपिंग पॉलिसी मधून वगळले जाणार आहेच पण या गाड्यांना विशेष नंबर प्लेट दिली जाणार असून त्यावर व्हीए ही अक्षरे असतील.

रस्ते परिवहन व राज्यमार्ग मंत्रालयाने विंटेज कार्स साठी नियमावली व नोंदणी अधिसूचना मसुदा तयार केला आहे. त्यानुसार विंटेज कार्स साठी विशेष नंबर प्लेट दिली जाईल. विंटेज मोटार वाहन आदेश २०१९ प्रमाणे रजिस्टर नंबर प्लेटवर XXVAYY अशी अक्षरे येतील. त्यातील व्हीए विंटेज साठी एक्सएक्स म्हणजे संबंधित राज्याचा कोड व वायवाय ही जोड शब्द साखळी असेल. त्यानंतर ०१ ते ०९ असा नंबर येईल. ५० वर्षाहून अधिक जुन्या विंटेज कार्सना ऐतिहासिक, सांस्कृतिक, तंत्र आणि कलात्मक महत्व मिळावे म्हणून हा निर्णय घेतला गेला असल्याचे समजते.

विशेष म्हणजे या विंटेज कार्स या नव्या नंबर प्लेटसह रस्त्यावर चालविता येतील मात्र व्यावसायिक कारणासाठी त्यांचा वापर करता येणार नाही. यापूर्वी विंटेज कार रॅली मध्ये सहभागी होणाऱ्या कार्स नोंदणी न करताच चालविण्याची परवानगी सरकार देत होते.

Leave a Comment