फाशी दिलेल्या दोराचे नंतर काय केले जाते?


दिल्लीत घडलेल्या निर्भया गँगरेप प्रकरणातील चार दोषींना फाशी देण्याची वेळ जवळ येऊ लागली असून फाशीचे दोर तुरुंगात पोहोचले असल्याचे व त्याच्या चाचण्या घेतल्या जात असल्याचे वृत्त आले आहे. मात्र फाशी दिल्यानंतर या दोराचे नक्की काय केले जाते याची माहिती बहुतेकांना नसते. विशेष म्हणजे फाशी साठी वापरल्या गेलेल्या या दोरांसंदर्भात अनेक अंधविश्वास प्रचलित आहेत.

ब्रिटनमध्ये १९६५ पासून फाशीवर बंदी आहे. मात्र त्यापूर्वी ही शिक्षा दिली जात असे तेव्हा तेथील जल्लाद या दोराचे छोटे छोटे तुकडे करून ते विकत असत आणि लोक ते आनंदाने खरेदी करत असत असे सांगतात. ब्रिटनमध्ये असा समज होता की फाशी देण्यासाठी वापरलेल्या दोराचे तुकडे घरात ठेवले किंवा लॉकेटमध्ये घातले तर माणसाचे नशीब फळफळते. त्यामुळे असे दोर विकले जात असत अश्या नोंदी इतिहासात आहेत. फाशी दिलेला दोर जल्लादलाच दिला जात असे.

कोलकाता येथील जल्लाद नाटा मल्लिक यानेही फाशीच्या दोराचे तुकडे लॉकेट मध्ये घालून त्याची विक्री करून अमाप पैसा मिळविला होता. २००४ मध्ये त्याने रेप आणि मर्डरचा दोषी ठरलेल्या धनंजय चटर्जी याला फासावर लटकविल्यावर त्या दोराचे लॉकेट बनवून प्रत्येकी दोन हजार रुपयांना विकले होते. बंगाल मध्येही फाशी दोराबाबत ब्रिटन सारखाच समज होता. त्यामुळे नोकरी नसलेले नोकरी मिळावी, कर्जापासून मुक्ती मिळावी, नशीब बदलावे अशी इच्छा असलेले अशी लॉकेट खरेदी करत.

जल्लाद नाटा कडे फाशी दिलेले जुने दोरही होते. त्याने त्याचीही लॉकेट बनवून ५०० रुपयात एक अशी विकली होती. त्याने घराबाहेर एक टॉवेल फाशीच्या गाठीप्रमाणे गाठ मारून टांगून ठेवला होता. तेथे अनेक जण लॉकेट खरेदी करण्यासाठी गर्दी करत असत. काही वेळा मात्र असे दोर जाळले जातात. एखाद्या फारच विवादित अथवा दहशतवाद्याला फाशी दिली असेल तर तो दोर मात्र ताबडतोब नष्ट केला जातो असेही सांगितले जाते.

Leave a Comment