जगातल्या सर्वात उंच तरंगत्या क्रिसमस ट्रीचे उद्घाटन


डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वत्र नाताळच्या सणाचे वेध लागतात. बाजारपेठा विविध वस्तूंनी नटतात आणि यंदाचे क्रिसमस ट्री कसे सजवायचे याची तयारी घरोघरी सुरु होते. ब्राझीलच्या रिओ द जानेरो मध्ये याच सणाची तयारी म्हणून पारंपारिक, तरंगत्या आणि जगातील सर्वात उंच क्रिसमस ट्रीचा उद्घाटन सोहळा मोठ्या जोशात साजरा झाला आणि तो पाहण्यासाठी शेकडो लोकांनी एकच गर्दी केली होती. शनिवारी हा सोहळा पार पडला. सायंकाळी हे भव्य ट्री विविध रंगी रोषणाईने झगमगून उठले आणि त्यापाठोपाठ म्युझिकल शो आणि आतषबाजीने आसमंत उजळून गेले.

रिओ द जानेरोच्या दक्षिण भागात असे तरंगते आणि जगातील सर्वात उंच क्रिसमस ट्री उभे करण्याची प्रथा १९९६ पासून सुरु झाली असून हे स्थान आता प्रतिष्ठेचे बनले आहे. सुमारे २४ मजली इमारतीच्या उंचीचे म्हणजे २३० फुट उंचीचे हे क्रिसमस ट्री ११ तरंगत्या प्लॅटफॉर्मवर उभे केले असून ते ९ लाख एलईडी दिव्यांनी सजविले गेले आहे. शहरातील हे सर्वाधिक आकर्षक स्थळ असून या ट्रीचे उद्घाटन म्हणजे नाताळाच्या तयारीची आणि उत्सवाची सुरवात मानले जाते. रोड्रीगो डी फ्रीटास लगुन मध्ये ही क्रिसमस ट्री उभी केली गेली आहे.

Leave a Comment