आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट, टीम इंडिया अव्वल स्थानी


नवी दिल्ली – पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजने ८ गडी राखून पराभव केला. वेस्ट इंडिजने शिमरॉन हेटमायर (१३९) आणि शे होप (१०२) यांनी ठोकलेल्या शतकांच्या जोरावर मालिकेत विजयी सलामी दिली. विराट या सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरला, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या क्रमवारीनुसार कसोटी क्रिकेटमध्ये विराट अव्वलस्थानी कायम आहे. जागतिक कसोटी क्रमवारी आयसीसीने सोमवारी जाहीर केली. कसोटी फलंदाजांच्या यादीत कर्णधार विराट कोहली आणि टीम इंडिया संघांच्या यादीत अव्वल स्थान कायम राखले. पण दुखापतीमुळे गोलंदाज जसप्रीत बुमराह सहाव्या स्थानी फेकला गेला आहे.

बांगलादेशविरूद्धच्या मालिकेत विराटने द्विशतक ठोकले. तसेच दिवस-रात्र कसोटीतदेखील शतक झळकवल्यामुळे नव्या यादीनुसार आपले अव्वल स्थान त्याने कायम राखले आहे. विराट कसोटीत ९२८ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. तर ९११ गुणांसह स्मिथ दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (८६४), भारताचा चेतेश्वर पुजारा (७९१) आणि ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबूशेन (७८६) हे टॉप ५ मधील खेळाडू आहेत. ७५९ गुणांसह मुंबईकर अजिंक्य रहाणे हा देखील सहाव्या स्थानी कायम आहे.

जसप्रीत बुमराहला गोलंदाजांच्या यादीत दुखापतीचा फटका क्रमवारीत बसला आहे. तो दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपासून क्रिकेटपासून दूर असल्यामुळे त्याची क्रमवारीत घसरण झाली असून सहाव्या स्थानी तो फेकला गेला आहे. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स या यादीत अव्वल आहे. तर रवींद्र जाडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी कायम आहे. तसेच भारतही ३६० गुणांसह क्रमवारीत अव्वल आहे. दुसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियापेक्षा (२१६) भारत १४४ गुणांनी पुढे आहे.

Leave a Comment