‘हे’ दोन भारतीय खेळाडू मोडू शकतात माझा 400 धावांचा विक्रम


मुंबई : वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज ब्रायन लाराच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या आहे. कसोटी सामन्यात एका डावात लाराने 400 धावा केल्या होत्या. अद्यापपर्यंत लाराचा हा विक्रम जगभरातील कोणत्याही फलंदाजाला तोडता येऊ शकलेला नाही. पण टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा आपला सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडू शकतात, असा विश्वास ब्रायन लाराने व्यक्त केला आहे.

आक्रमक खेळणारे खेळाडू असे असतात, जे कोणताही विक्रम मोडण्याची क्षमता ठेवतात, असे देखील लाराने म्हटले आहे. सध्या ज्या फॉर्ममध्ये विराट कोहली खेळत आहे आणि जितक्या धावा जमा करत आहे, त्यावरुन माझा विक्रम मोडण्याची क्षमता विराटमध्ये असल्याचे ब्रायन लाराने सांगितले. तर माझा हा विक्रम मोडण्याची रोहित शर्मामध्येही क्षमता आहे. एक किंवा अर्ध्या दिवसात रोहित माझा विक्रम मोडू शकतो, असे लाराने म्हटले.

विराट आणि रोहित शर्मा यांच्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नरदेखील माझा 400 धावांचा विक्रम मोडू शकतो. डेविड वॉर्नरने काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान विरोधात 335 धावांची नाबाद खेळी केली होती. वॉर्नर लाराचा विक्रम त्यावेळी मोडणार असे वाटत असतानाच ऐनवेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने डाव घोषित केला आणि वॉर्नरला मागे परतावे लागले. त्यानंतर डेविड वॉर्नरशी लाराने बातचित केली होती. ऑस्ट्रेलियाच्या डावाची घोषणा करण्याचा निर्णय माझ्या एकट्याचा नव्हता, संपूर्ण संघाचा तो निर्णय होता. त्यावेळी पावसाची शक्यता असल्याने तो निर्णय योग्य असल्याचे डेविड वॉर्नरने सांगितले.

2004 मध्ये इंग्लंडविरुद्ध 400 धावांचा डोंगर ब्रायन लाराने उभारला होता. 582 चेंडूत लाराने 400 धावा ठोकत इतिहास रचला होता. यामध्ये 43 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. या इंग्लंडविरुद्धच्या या सीरिजमध्ये विंडीजचा सलग तीन सामन्यात पराभव झाला होता. त्यामुळे कर्णधार ब्रायन लारावर टीका होत होती. तसेच तीन सामन्यात लाराने अवघ्या 100 धावाच केल्या होत्या. यामध्ये लारा दोन वेळा शुन्यावर बाद झाला होता. पण त्यानंतर लाराने चौथ्या सामन्यात 400 धावा ठोकत आपल्या टीकाकारांना बॅटने उत्तर दिले.

Leave a Comment