अवघ्या 50 पैशांसाठी ग्राहकाला बँकेची नोटीस

(Source)

राजस्थानच्या कोलिहान येथे राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये बँकेद्वारे 50 पैसे जमा करण्यासंबंधी ग्राहकाला नोटीस पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. झुंझुनू जिल्ह्यातील खेतडी येथील एसबीआय बँकेच्या शाखेने जितेंद्र कुमार व त्यांचे वडील विनोद सिंह यांना 50 पैसे जमा करण्यासाठी नोटीस पाठवली. यामध्ये पैसे न भरल्यास कारवाई करण्यात येईल असे देखील सांगितले.

दोन दिवसांपुर्वी रात्री नोटीस घराच्या बाहेर लावून जितेंद्र यांना लोक न्यायालयात बोलवण्यात आले. पाठीत दुखत असल्याने जितेंद्र लोक न्यायालयात जाऊ न शकल्याने त्यांनी वडील विनोद सिंह यांना पाठवले.

विनोद सिंह न्यायालयात 50 पैसे जमा करण्यासाठी पोहचले. विनोद सिंह यांनी तेथे उपस्थित अधिकाऱ्यांना 50 पैसे जमा करून नो ड्यूज जारी करण्यास सांगितले. तेव्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पैसे जमा करण्यास व पावती देण्यास टाळाटाळ केली. बँकेद्वारे 50 पैशांची नोटीस पाहून वकील देखील भडकले. यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाया घेतला.

विनोक सिंह यांचे वकील विक्रम सिंह यांनी सांगितले की, त्यांच्या क्लाइंटला 50 पैसे जमा करण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. ते 50 पैसे जमा करण्यासाठी आले होते. मात्र बँकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे जमा करण्यास नकार दिला व एनओसी देखील दिली नाही. बँकेच्या विरोधात नोटीस पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment