जामिया विद्यापीठातील आंदोलनाला आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांचा पाठिंबा


मुंबई – ईशान्य भारतात नागरिकत्व दुरूस्ती कायदा लागू केल्यानंतर हिंसाचार उफाळून आला. रविवारी दिल्लीतही याचे लोळ पोहोचले. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर धरपकड आणि धुमश्चक्री रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनीही जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

नागरिकत्व कायद्यात केंद्र सरकारने दुरूस्ती केल्यानंतर आसाम, मेघालय, त्रिपुरा, सिक्कीम नागालँड, मिझोराम यासह सात राज्यांमधील लोक रस्त्यावर उतरले आहेत. ईशान्य भारतात मागील आठवड्यापासून हिंसेचा उद्रेक झाला आहे. तिथे जाळपोळीचे सत्र सुरू असतानाच राजधानी दिल्लीतही रविवारी दुपारनंतर तणाव निर्माण झाला.

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नागरिकत्व कायद्याला विरोध करत आंदोलन केले. दिल्ली पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये या आंदोलनावेळी वाद झाला. पोलिसांनी त्यानंतर लाठीमार केल्याने आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. चार बससह अनेक वाहने यात पेटवून देण्यात आली. त्यानंतर जामिया विद्यापीठात जाऊन पोलिसांनी विद्यार्थ्यांची धरपकड केली. यावेळीही लाठीमार करण्यात आला. या घटनेचा विद्यापीठाच्या कुलगुरूनीही निषेध केला.

मुंबईतही जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद उमटले असून रविवारी रात्री आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी हातात मशाली घेऊन रॅली काढत जामियातील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावर आंदोलनाच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी काढलेल्या रॅलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तर #IITBombay असा हॅशटॅग ट्विटरवरही ट्रेंड झाला आहे. अनेकांनी यात विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे. तर काहीजणांनी टीकाही केली आहे.

अलिगढ मुस्लिम विद्यापीठातही दिल्लीतील घटनेचे पडसाद उमटले. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारानंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी याचा निषेध केल्यानंतर पोलिसांनी विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांना मारहाण केली. पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादानंतर विद्यापीठ प्रशासनाने सुट्या जाहीर केल्या आहेत.

Leave a Comment