नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात निदर्शन करणाऱ्यांची सुटका


नवी दिल्ली – रविवारी दिल्लीतील जामिया विद्यापीठाच्या परिसरात नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली होती. त्या दरम्यान हिंसाचार देखील उफाळला होता. या पार्श्वभूमीवर रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आलेल्या जवळपास ५० निदर्शकांची पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास सुटका केली आहे.

रविवारी सायंकाळी अनेक बस निदर्शकांनी पेटवल्या होत्या. सहा पोलीस, दोन अग्निशामक जवान आणि काही विद्यार्थ्यांसह जवळपास १०० जण धुमश्चक्रीत जखमी झाले. त्याचबरोबर मेट्रो रेल्वेची पाच स्थानकेही हिंसाचारामुळे बंद करण्यात आली. पोलिसांवर विद्यापीठाच्या आवारातून दगडफेक करण्यात आल्यामुळे निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा मारा करावा लागला, यानंतर पोलिसांना काही उपद्रवी शक्तींनी विद्यापीठात घुसखोरी केल्याच्या संशय आल्याने त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या आवाराच्या बाहेर काढले. तसेच काही निदर्शकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

तर दुसरीकडे विद्यापीठ प्रशासन व विद्यार्थांचा आरोप आहे की, त्यांच्याबरोबर पोलिसांनी अमानुषता केली आहे. पोलीस मुख्यालयाबाहेर रात्री ९ वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होते. ताब्यात घेण्यात आलेल्यांची सुटका झाल्यावर विद्यार्थी मुख्यालयातून माघारी फिरले.

Leave a Comment