आठवलेंनी वर्तवले भाकीत; राज्यात होणार राजकीय भूकंप


नवी दिल्ली – महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याचे भाकीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्तवले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर तब्बल महिनाभर घडलेल्या नाट्यमय सत्तासंघर्षानंतर सध्या राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह घटक पक्षांचे असे महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आलेले आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय भूकंपाची शक्यता आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्तवल्याने राजकीय तर्कवितर्कांना सुरूवात झाली आहे.

दोन महिने महाराष्ट्राच्या राजकारणासाठी भूकंपाचे असून एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी भूकंप केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा भूकंप झाला आणि आता कोणाचा भूकंप होणार आहे हे आपल्या आगामी काळात दिसेलच, पण कोणता ना कोणता भूकंप होण्याची शक्यता असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.

दरम्यान महाविकास आघाडीचे सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून ते केवळ एकाच आठवडय़ाचे आहे. या अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर करणे हा कारभाराच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा भाग असणार आहे. शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात सत्तेतून पायउतार व्हावे लागल्याने डिवचला गेलेला भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या अधिवेशनात आक्रमक भूमिका घेत कोंडी करण्याचे डावपेच आखत आहेत. त्यातूनच शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत करण्यासाठी २३ हजार कोटी रुपयांची तरतूद जाहीर करावी, महाविकास आघाडीचे सरकार स्थगिती सरकार असून सावरकरांचा अवमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावणारी शिवसेना सत्तेसाठी लाचार झाल्याचे टीकास्त्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोडले आहे.

Leave a Comment