राम मंदिराची चार महिन्यांत करणार निर्मिती; अमित शहांची घोषणा


झारखंड – झारखंड येथील प्रचारसभेत बोलताना चार महिन्यात राम मंदिराची निर्मिती करणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. अयोध्येत येत्या चार महिन्यात आकाशाला गवसणी घालणारे भव्य राम मंदिर उभारले जाईल असे देखील त्यांनी म्हटले आहे.

अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे मोकळा झाला आहे. त्यामुळे भव्य राम मंदिर येत्या चार महिन्यात उभारु अशी घोषणा मी करत असल्याचे अमित शहा यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर काँग्रेसने राम मंदिराचे प्रकरण प्रलंबित ठेवले. पण हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने मार्गी लावलेच त्याचबरोबर इतरही प्रकरणे मार्गी लावली.

अमित शहा यांची झारखंड येथील पाकुडमध्ये सभा झाली. अमित शहा यांनी ही घोषणा त्या सभेत केली आहे. चर्चेतून वादग्रस्त जागेसंदर्भातील निर्णय सुटावा असे आम्हाला वाटत होते. पण चर्चा निष्फळ ठरली, तेव्हा न्यायालयाने रोज सुनावणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो सर्वांसमोर असल्याचेही अमित शहा यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment