लेफ्ट. जन. धिल्लन आणि श्वान मेनका यांचा एकमेकांना सॅल्युट


सध्या सोशल मीडियावर एक फोटो वेगाने व्हायरल होत असून त्यात १५ व्या कोर कमांडचे लेफ्ट. जनरल केजेएस धिल्लन आणि एक श्वान एकमेकांना सॅल्युट करताना दिसत आहेत. शनिवारी हा फोटो ट्विट झाला त्याला रीट्विट करताना धिल्लन यांनी अनेकांचे अनेकदा प्राण वाचविणाऱ्या शूराला सलाम असे म्हटले आहे. धिल्लन म्हणतात हा फोटो १ जुलै रोजी घेतला गेला होता. याच दिवशी अमरनाथ यात्रा सुरु झाली होती आणि धिल्लन अमरनाथचे दर्शन घेण्यासाठी गुहेकडे जात असताना ५० मीटर अलीकडे स्नीफर मेनका ड्युटीवर तैनात होती. धिल्लन तेथे पोहोचताच तिने त्यांना सॅल्युट केला.

भारतीय सेनेतील सर्व वरिष्ठ अधिकारी एक परंपरा नेहमी पाळतात. ती म्हणजे ज्युनिअर पैकी कुणीही त्यांना सॅल्युट केला तर त्याला जबाब म्हणून उलट सॅल्युट संबंधित वरिष्ठांकडून केला जातो. लेफ्ट. कर्नल धिल्लन यांनी हीच परंपरा पाळून श्वान पथकात तैनात असलेल्या मेनका या लेब्रोडोर जातीच्या श्वानाला उलट सॅल्युट केला. सैन्य कारवाई सुरु असताना अथवा संरक्षणासाठी सैनिक तैनात असतील तेथे ही प्रशिक्षित केलेली कुत्रीही असतात आणि दहशतवादी पाठलाग, स्फोटके शोधून काढणे, बर्फाखाली गाड्ल्या गेलेल्या लोकांचा शोध घेणे, गस्त घालणे, राखण करणे अशी अनेक जबाबदारीची कामे ती पार पडतात.

लष्कराच्या रीमाउंट आणि व्हेटरनरी कोरकडून या कुत्र्यांना प्रशिक्षित केले जाते आणि त्याचे मुख्यालय मेरठ येथे आहे. उत्तम कामगिरी बजावणाऱ्या श्वानांना शौर्य पदकेही दिली जातात.

Leave a Comment