इंडोनेशियाच्या बाली मधले प्राचीन बेसाखी मंदिर


इंडोनिशिया जगभरातील पर्यटकांचा आवडता देश आहेच आणि त्यातही मुकुटमणी म्हणता येईल असे ठिकाण म्हणजे बाली बेट. या बेटावर आजही हिंदू संस्कृती अत्यंत उत्तमरीतीने जतन केली गेली असून येथे जगातील अनेक सुंदर अशी प्राचीन आणि विशाल हिंदू मंदिरे आहेत. अन्गुंग पहाडाच्या पार्श्वभूमीवर पहाड रांगात बांधले गेलेले पुरा बेसाखी मंदिर हे यातील सर्वात सुंदर आणि भव्य मंदिर आहे. बेसाखी हा शब्द संस्कृत वासुकी या शब्दावरून आला असून हे मंदिर नागराज वासुकी याचे मंदिर आहे. देव आणि दानव यांनी अमृत मिळविण्यासाठी जे समुद्रमंथन केले तेव्हा समुद्र घुसळण्यासाठी याच वासुकी नागाचा दोरी म्हणून उपयोग केला गेला होता असे धर्मग्रंथ सांगतात.

जावा भाषेत बेसाखीचा अर्थ अभिनंदन असा आहे. या प्रचंड मंदिरात हिंदू देव देवताच्या अनेक मूर्ती असून त्यातील ब्रह्मा विष्णू आणि महेश याची देवळे विशेष महत्वाची आहेत. याच आवारात प्रचंड मोठे प्रांगण असून तेथे वासुकीची पूजा अर्चा केली जाते. हे साधना करणाऱ्या साधकांचे मुख्य केंद्र आहे. येथे हिंदू धर्मियांचे सर्व सण उत्सव मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. या मंदिराला मदर टेम्पल ऑफ बाली म्हणूनही ओळखले जाते. जगभरातून लाखो पर्यटक या नितांतसुंदर मंदिराला दरवर्षी भेट देतात. मंदिर पहाडावर असल्याने आजूबाजूच्या निसर्गाचे सुंदर दृश्य येथून पाहता येते.

अनेक भूकंप धक्के आणि ज्वालामुखीचे उद्रेक सहन करूनही हे मंदिर आजही चांगल्या स्थितीत आहे. या आवारात किमान २३ प्राचीन भव्य मंदिरे आहेत.

Leave a Comment