विखेंना भाजपमध्ये घेऊन फायदा नाही पण तोटा नक्कीच झाला


नाशिक : माजी मंत्री राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि एकूणच झालेल्या इनकमिंगवर राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपत घेऊन फायदा तर झालाच नाही पण तोटा मात्र नक्कीच झाला, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली. राम शिंदेंनी पक्षातील काही नेत्यांनी विरोधात काम केल्याचा आरोपही केला आहे. काल नाशिकमध्ये भाजपमधील पराभूत झालेल्या 12 उमेदवारांची बैठक पार पडली. यावेळी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना राम शिंदे यांनी विखे पाटलांवर निशाणा साधला.

एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेही या बैठकीला अनुपस्थित राहिल्या. आपण बैठकीला वैयक्तिक कारणाने उपस्थित राहू शकलो नसल्याचे रोहिणी खडसेंनी स्पष्ट केले. या बैठकीचे आयोजन भाजप नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी करण्यात आले होते.

पक्षात राधाकृष्ण विखे पाटील यांना घेतल्यानंतर ते म्हणाले होते, की 12-शून्य नगरमध्ये करू, पण तसे काहीही न होता. उलट आमच्या असलेल्या जागांपैकी दोन जागा कमी झाल्या. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपत घेऊन काही फायदा झाला नसल्याचे मला वाटते, असे म्हणत माजी मंत्री राम शिंदे यांनी विखे पाटील आणि एकूणच झालेल्या इनकमिंगवर नाराजी व्यक्त केली. पक्षात राधाकृष्ण विखे-पाटील आणि मधुकर पिचड आल्यामुळे भाजपच्या आमदारांची संख्या सातवर गेली होती. परिणामी ही संख्या वाढण्याची अपेक्षा असताना कमी झाली. असे सांगत विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षात खोडी करतात, अशी टीका राम शिंदे यांनी केली.

विखेंचा कोपरगाव, राहुरी मतदारसंघातील पराभूत उमेदवार अनुक्रमे स्नेहलता कोल्हे आणि शिवाजी कर्डिले यांनाही फायदा झाला नसल्याचे सांगितले. कोपरगाव मतदारसंघातून विखे यांनी त्यांच्या मेहुण्याला अपक्ष उभे केले. पण, त्यांचे डिपोझिट जप्त झाल्याचे कोल्हे यांनी सांगितले. एकप्रकारे पक्षातील नेत्यांनीच विरोधात काम केल्यामुळे पराभव झाल्याचे स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले. तर, भाजपला आयात लोकांचा तोटाच झाल्याचे शिवाजी कर्डिले यांनीही सांगितले. दरम्यान, एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे अनुपस्थित राहिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. गोपीनाथगड येथे 12 डिसेंबरला झालेल्या मेळाव्यात एकनाथ खडसेंनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली होती. त्यामुळे तर रोहिणी खडसे गैरहजर राहिल्या नाहीत ना? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

Leave a Comment