राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय – देवेंद्र फडणवीस


मुंबई – दिल्लीतील भारत बचाओ रॅलीमध्ये सावरकरांबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानतंर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय असल्यामुळे संपूर्ण देशाची त्यांनी माफी मागवी. केवळ आडनाव गांधी असल्याने कोणी गांधी होत नसल्याचा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या देशामध्ये केवळ कारावासच भोगला, असे नाही. अनेक क्रांतीकारकांना त्यांनी प्रेरणा दिली. भारताच्या इतिहासामध्ये 2 वेळा काळ्या पाण्याची शिक्षा झालेला क्रांतीवीर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. अंदमानच्या कोठडीत 12 वर्षे त्यांनी अत्याचार सहन केला. याची कल्पना तरी राहुल गांधींना आहे का? असा सवालही फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. तर 12 वर्षे सोडा 12 तास तरी राहुल गांधी अशा कोठडीत राहू शकतात का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

त्यामुळे हा देश सावरकरांचा अपमान कधीच सहन करणार नाही. राहुल गांधीनी हे समजून घेतले पाहिजे, केवळ गांधी आडनाव लावून कोणी गांधी होत नाही. त्यासाठी कष्ट करावे लागतात, त्याग करावा लागतो. महाराष्ट्र आणि देश राहुल गांधीना कधीही माफ करु शकणार नाही, असे फडणवीस म्हणाले. शिवसेना आज सत्तेसाठी अश्या लोकांसोबत आहे की, जे स्वांतत्र्यवीर सावरकर यांचा देखील अपमान करतात. तर यावर शिवसेनेची आलेली प्रतिक्रिया किती मवाळ आहे. यापूर्वीच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या आहेत. त्यांची सत्ता त्यांना लखलाभ, सावरकरांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Leave a Comment