महाविकास आघाडीचे सरकार पुढील ५० वर्षे कायम राहील – मुख्यमंत्री


नागपुर – उद्यापासून सुरु होत असलेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूरात दाखल झाले असून या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना महाविकास आघाडीचे सरकार राज्यात पुढील केवळ पाचच नाही पंचवीसही नाही तर पन्नास वर्षे कायम राहिल, असे म्हटले आहे.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, जनतेचे आशिर्वाद माझ्याकडे आहेत. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण हा संपूर्ण महाराष्ट्र एक आहे. आम्ही देशाला अभिमान वाटेल असे सरकार, शासन आम्ही चालवू. आपण जर एकत्र आलो तर हे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे तर २५ वर्षेच काय ५० वर्षे आणि पिढ्यान पिढ्या कायम राहिले, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खेड्यापाड्यातील जनता महाराष्ट्राचा खरा राजा असून माझ्या समोर तो बसला असल्यामुळे मी माझा आजवरचा अनुभव पणाला लावून माझ्या गोरगरीब जनतेला समाधान देण्याचा प्रयत्न करेन. मुख्यमंत्री म्हणून आता खऱ्या अर्थाने माझी कारकीर्द सुरु होत असल्यामुळे असेच कायम तुमचे आशिर्वाद राहू द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले.

Leave a Comment